पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना; हिवरे बाजार गावाचे कौतुक

मुंबई : ‘आपले गाव-आपली जबाबदारी’ संकल्पनेतून अहमदनगर जिल्ह्यातील हिवरे बाजार गावात राबविण्यात आलेल्या करोनामुक्ती पॅटर्नची गुरुवारी खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दखल घेतली. या उपक्रमाचे कौतुक करतानाच जिल्ह्याच्या ज्या गावात करोनाचा प्रादुर्भाव झाला नाही तिथे तो होणार नाही आणि जिथे झाला आहे तिथे कडक उपाययोजनांद्वारे तो नियंत्रित करून जिल्ह्यातील गावे करोनामुक्त होतील या दृष्टीने प्रयत्न करावेत. तसेच लसीकरण मोहिमेतील त्रूटी दूर करतानाच लशींची एकही मात्रा वाया जाणार नाही याची काळजी घेण्याच्या सूचनाही मोदी यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या.

पंतप्रधानांनी दूरचित्र संवादाच्या माध्यातून ११ राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत या राज्यातील ६० जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद साधला. त्यात राज्यातील अहमदनगर, बुलढाणा, चंद्रपूर, सातारा, नाशिक, बीड, परभणी, सांगली, अमरावती, जालना, वर्धा, सोलापूर, पालघर, उस्मानाबाद, लातूर, कोल्हापूर, नागपूर अशा १७ जिल्हाधिकाऱ्यांचा समावेश होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे, मुख्य सचिव सीताराम कुंटे या बैठकीस उपस्थित होते. प्रधानमंत्र्यांनी यावेळी ज्या जिल्ह्यांनी नावीन्यपूर्ण उपक्रम राबवीत जिल्ह्यातील करोना रुग्णवाढीवर नियंत्रण मिळवले, त्या काही जिल्ह्यांच्या नावीन्यपूर्ण उपक्रमांची माहिती समजून घेतली.

अहमदनगरचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी हिवरे बाजारच्या करोनामुक्ती पॅटर्नची माहिती पंतप्रधानांना दिली. या गावाने आरोग्य आणि स्वयंसेवकांची चार पथके  स्थापन करून गावातील प्रत्येक घराचे सर्वेक्षण के ले. करोना लक्षण आढळणाऱ्या प्रत्येक रुग्णाच्या घराची आणि कुटुंबाची जबाबदारी या पथकाने घेऊन रुग्णांना विलगीकरण कक्षात दाखल होण्यास प्रोत्साहित केले. त्यामुळे रुग्णांची आता आपल्या घराचे आणि कुटुंबाचे काय होणार, शेतीभाती आणि दूध दुभत्याच्या कामाचे काय होणार ही काळजी मिटली. ज्यांचा सुरुवातीला विलगीकरणात जाऊन उपचारांना विरोध होता ते या प्रयत्नांमुळे विलगीकरणात राहून उपचार घेण्यास तयार झाले. यातूनच करोनामुक्त हिवरे बाजारची वाटचाल सोपी होऊन गाव काही कालावधीतच करोनामुक्त झाल्याची माहिती डॉ. भोसले यांनी मोदी यांना दिली.

हिवरे बाजारचा हा करोनामुक्तीचा पॅटर्न पद्माश्री पोपटराव पवार यांच्या मार्गदर्शनाखाली १३१६ ग्रामपंचायतींमध्ये राबविला जात आहे. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात राज्यात राबविण्यात आलेल्या ‘माझे कुटुंब-माझी जबाबदारी’ अभियानाची याकामी खूप मदत झाली. या अभियानांतर्गत जिल्ह्यातील प्रत्येक घरापर्यंत प्रशासनाला पोहोचता आले, त्यातून सहव्याधी असलेल्या लोकांची माहिती मिळाली. त्यांना योग्य मार्गदर्शन तसेच संशयित रुग्ण शोधून त्यांच्यावर योग्य वेळेत उपचार करणे शक्य झाले. जिल्ह्यात प्रत्येक कामासाठी स्वतंत्र समन्वयक अधिकारी नियुक्त करण्यात आला. गावपातळीवरील यंत्रणेला या कामात सहभागी करून घेण्यात आले. तलाठी, सरपंच, ग्रामसेवक, पोलीसपाटील या ग्रामस्तरीय अधिकाऱ्यांशी थेट संवाद साधला. हे करताना आपला गाव- आपली जबाबदारी ही संकल्पना त्यांच्यासमोर मांडण्यात आली. दुसऱ्या लाटेत जिल्ह्यातील रुग्णांचे गृहविलगीकरण पूर्णपणे बंद करण्यात आले. रुग्णांना करोना काळजी केंद्रात नेऊन उपचार करण्याचे धोरण ठरवल्याने संसर्ग रोखण्यास मदत झाली असेही ते म्हणाले.

करोनाच्या दुसऱ्या लाटेवर वाढत्या रुग्णसंख्येवर नियंत्रण मिळवताना जिल्ह्यात केंद्र आणि राज्य शासनाच्या करोना प्रतिबंधक उपाययोजना आणि उपचार पद्धतीचे काटेकोरपणे पालन करण्यात आल्याचेही भोसले यांनी पंतप्रधानांना सांगितले.

मुंबईची स्तुती

बैठकीत केंद्रीय आरोग्य सचिवांनी देशभरातील करोनास्थिती, उपाययोजना याचे सविस्तर सादरीकरण केले. यात त्यांनी उत्तम प्राणवायू व्यवस्थापन आणि करोना नियंत्रणासाठी मुंबईत करण्यात आलेल्या प्रयत्नांचा आवर्जुन उल्लेख केला. प्राणवायूचा राखीव साठा करतांना अधिकाऱ्याचे नाव, संपर्क क्रमांक यांची माहिती जाहीर करून प्राणवायूची उपलब्धता आणि वितरणाचे उत्तम व्यवस्थापन मुंबईत करण्यात आल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले.

मुख्यमंत्र्यांना बोलू दिले नाही…

जिल्हाधिकाऱ्यांबरोबर आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत संबंधित राज्यांचे मुख्यमंत्रीही सहभागी झाले होते. परंतु पंतप्रधान कार्यालयाने फक्त जिल्हाधिकाऱ्यांनाच बोलण्याची संधी दिली. मुख्यमंत्र्यांची इच्छा असतानाही त्यांना बोलण्यास परवानगी मिळाली नाही.