शैलजा तिवले
मुंबई : ज्येष्ठ नागरिकांना पुरेसा वेळ देणे शक्य नसल्यामुळे त्यांच्या प्रकृतीशी संबंधित तक्रारी सोडविण्यात अडचणी येत असल्याचे मत सुमारे ८५ टक्के डॉक्टरांनी व्यक्त केले आहे. तसेच यांच्या प्रकृतीची सर्वसमावेशक तपासणी करण्याचे प्रमाण केवळ नऊ टक्के आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांच्या आजारांकडे प्राधान्याने लक्ष देण्यासाठी स्वतंत्र विभाग आणि बाह्यरुग्ण विभाग असणे आवश्यक असल्याचे केईएम रुग्णालयाच्या वैद्यकीय संशोधनातून निदर्शनास आले आहे.
भारतातील ज्येष्ठ नागरिकांची लोकसंख्या २०११ मध्ये ८.६ टक्के होती. २०५० पर्यंत यामध्ये वाढ होऊन ती १९ टक्क्यांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्यासाठी स्वतंत्र विभागाबाबतची तज्ज्ञांमध्ये असलेली जागृती, पाहण्याचा दृष्टिकोन आणि या विभागाची आवश्यकता यावर प्रकाश टाकणारे संशोधन ‘जर्नल ऑफ द असोसिएशन ऑफ फिजिशियन्स’ या नियतकालिकामध्ये नुकतेच प्रसिद्ध झाले आहे. वैद्यकीय क्षेत्रातील आठ शाखांमधील ४०० तज्ज्ञ डॉक्टर आणि ४०० इंटर्नशीप विद्यार्थी असे एकत्रित ८०० जण या अभ्यासामध्ये सहभागी झाले होते. देशभरातील २३ राज्ये आणि पाच केंद्रशासित प्रदेशांमधील डॉक्टरांचा यात समावेश केलेला आहे. ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी स्वतंत्र वैद्यकीय शाखा असल्याची माहिती ४०० तज्ज्ञ डॉक्टरांपैकी ४८.५ टक्के डॉक्टरांना याबाबत माहिती नाही. ज्येष्ठ नागरिक तपासणीसाठी आल्यानंतर केवळ त्याच आजाराची तपासणी न करता सर्वसमावेशक तपासणी कशी करायला हवी याबाबतचे ज्ञान ४४ टक्के डॉक्टरांमध्येच असल्याचे आढळले. विशेष म्हणजे स्वतंत्र विभाग, सर्वसमावेशक तपासणी आणि फिजिओथेरपी आणि ऑक्युपेशन थेरपीचे ज्ञान असलेल्या डॉक्टरांचे प्रमाण केवळ १७ टक्के असल्याचे यातून समोर आले आहे.
स्वतंत्र विभाग आणि बाह्यरुग्ण विभागाची गरज
ज्येष्ठ नागरिकांच्या आजारांचे निदान आणि उपचार वेळेत करण्यासाठी स्वतंत्र विभाग असणे गरजेचे आहे असे ८० टक्के डॉक्टरांचे म्हणणे असून यासाठी स्वतंत्र बाह्यरुग्ण विभाग सुरू करणे अत्यावश्यक असल्याचे मत सुमारे ९६ टक्के डॉक्टरांनी व्यक्त केले. वृद्धांसाठी स्वतंत्र विभाग असल्यास या वयामध्ये उद्भवणाऱ्या मानसिक आजारांचे निदान आणि उपचार वेळेत केले जातील, असे मत ९० टक्के तज्ज्ञ डॉक्टरांनी व्यक्त केले. तर स्वतंत्र विभाग असल्यास यांचे आजार आणि उपचार याकडे सर्वागीण लक्ष दिले जाईल, असे ९३ टक्के डॉक्टरांना वाटते. आजारांचे निदान आणि उपचार एकाच ठिकाणी उपलब्ध झाल्यास विविध पॅथीच्या औषधांचा एकाच वेळी केला जाणार वापर आणि औषधांचा अयोग्य वापरही कमी होण्यास मदत होईल, असे ८७ टक्के डॉक्टरांनी नमूद केले आहे. यामुळे या रुग्णांच्या आयुष्याचा दर्जाही सुधारण्यास फायदा होईल, असे ९० टक्के डॉक्टरांना वाटते.
प्रशिक्षण घेण्यासाठी उत्सुक
वृद्धांच्या आरोग्यासंबंधी अधिक प्रशिक्षण आणि माहिती घेण्यासाठी सुमारे ९५ टक्के डॉक्टर उत्सुक असल्याचे या अभ्यासात नमूद केले आहे. ३७ टक्के इंटर्नशिपचे विद्यार्थी ज्येष्ठ नागरिकांचे आरोग्य या शाखेतून पदव्युत्तर शिक्षण उपलब्ध असल्यास घेण्यास तयार आहेत. या वयोगटाची लोकसंख्या वाढत असून रुग्णसेवा देण्यास अधिक संधी असल्यामुळे या विषयात पुढील शिक्षण घेण्याची इच्छा असल्याचे ६४ टक्के विद्यार्थ्यांनी नमूद केले.
बहुतांश वेळा ज्येष्ठ नागरिक कोणतातरी एक आजार झाल्याची तक्रार घेऊन रुग्णालयात येतात. त्या आजारावरच उपचार केले जातात आणि ते घरी जातात. परंतु या वयोगटात बऱ्याचदा एक आजार हा दुसऱ्या आजाराशी निगडित असतो. यासाठी ज्येष्ठ नागरिकांची एकाच ठिकाणी विविध चाचण्या, तपासण्या म्हणजेच सर्वसमावेशक तपासणी होणे गरजेचे आहे आणि यासाठी ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र विभाग किंवा स्वतंत्र बाह्यरुग्ण विभाग असणे आवश्यक आहे, असे मत या अभ्यासाचे प्रमुख लेखक आणि केईएम रुग्णालयातील औषधशास्त्र विभागातील डॉ. संतोष सलागरे यांनी व्यक्त केले आहे.
संवाद साधण्यात अडचण
ज्येष्ठ नागरिक उपचारासाठी आल्यानंतर अनेकदा त्रास आणि आजार याचा संबंध लावणे अवघड जाते. तसेच या रुग्णांशी संवाद साधण्यासाठी बराच वेळ द्यावा लागतो. रुग्ण जास्त प्रमाणात असल्यामुळे त्यांचा त्रास समजून घेण्यात अडचणी येत असल्याचे ८५ टक्के डॉक्टरांनी सांगितले आहे. ५० टक्क्यांहून कमी डॉक्टर रुग्णांच्या मानसिक आरोग्याचीही तपासणी करतात. केवळ नऊ टक्के डॉक्टर सर्वसमावेशक तपासणी करतात. यामध्ये केवळ १२ टक्के डॉक्टर रुग्णांची फिजियोथेरपी किंवा ऑक्युपेशनल थेरपीच्या तज्ज्ञांमार्फत तपासणी करून घेत असल्याचे आढळले आहे.