scorecardresearch

बुलेट ट्रेनचे कर्ज पुढच्या पिढीच्या डोक्यावर

सरकार भिडेंना वाचवत असल्याचाही आरोप

Prithviraj-Chavan
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण ( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

पृथ्वीराज चव्हाण यांची टीका; सरकार भिडेंना वाचवत असल्याचाही आरोप

बुलेट ट्रेन हे दिवास्वप्न असून गेल्या दोन वर्षांत प्रकल्पाच्या किमती कशा रीतीने वाढवण्यात आला हा शोधाचा विषय आहे. अहमदाबादमध्ये होणाऱ्या आंतरराष्ट्रीय वित्तीय केंद्रासाठी बुलेट ट्रेनचा घाट घालण्यात आला असून या प्रकल्पासाठी घेण्यात येणारे कर्ज हे महाराष्ट्राच्या पुढच्या पिढीच्या डोक्यावर येणार आहे, अशी टीका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी राज्य सरकारवर केली.

राज्यातील कायदा व सुव्यवस्था ढासळल्याबाबत आणि राज्यातील उद्योग बंद पडून बेकारी वाढत असल्याबाबतच्या चर्चेत भाग घेताना पृथ्वीराज चव्हाण बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबईतील आंतरराष्ट्रीय वित्तीय केंद्र पळवून गुजरातला गिफ्ट सिटीमध्ये नेले. त्यासाठी आता मुंबई- अहमदाबाद बुलेट ट्रेनचा घाट घातला आहे. या प्रकल्पाचा ३० टक्के भाग महाराष्ट्रात तर ७० टक्के भाग गुजरातमध्ये येतो. तरीही महाराष्ट्रावर ५० टक्के कर्जाचा भार टाकण्यात येत आहे, असेही चव्हाण म्हणाले.

राज्यातील कायदा व सुव्यवस्था ढासळल्याचा आरोपही त्यांनी केला. भीमा-कोरेगाव दंगलीतील आरोपी मनोहर भिडे यांना राज्य सरकार ताब्यात का घेत नाही. त्यांना पकडायला सरकार का घाबरते, असा सवाल करत राज्य सरकार भिडे यांना वाचवत असल्याची लोकभावना झाली आहे, अशी टीका करत याबाबत सरकारने उत्तर द्यावे, अशी मागणी चव्हाण यांनी केली. त्याचबरोबर कॉंग्रेस-राष्ट्रवादी सरकारच्या काळात २०११ मध्ये सनातन संस्थेवर बंदीचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवला होता. सत्तांतर झाल्यावर भाजप सरकार आले. आता राज्य सरकारने याबाबत काय भूमिका घेतली आहे, असाही सवाल त्यांनी केला.

जितेंद्र आव्हाड यांनी भीमा-कोरेगाव दंगलीबाबत राज्य सरकार भिडे गुरुजींवर कारवाई करत नसल्याची टीका केली. भिडे गुरुजींमुळे दंगल झाल्याचा आरोप असताना त्यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार असतानाही मिलिंद एकबोटे यांना अटक होते पण भिडे गुरुजींना अटक होत नाही, याबद्दल जितेंद्र आव्हाड यांनी आश्चर्य व्यक्त केले.

लोया यांच्या मृत्यूची चौकशी का नाही?

न्या. लोया यांचा नागपुरात संशयास्पद मृत्यू झाला. दिल्लीतील नामवंत डॉक्टरांनी लोया यांचा मृत्यू हृदयविकाराने झालेला नाही, असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे न्या. लोया यांच्या मृत्यूची चौकशी झाली पाहिजे. पण राज्य सरकार चौकशी होऊ नये यासाठी प्रयत्न करत आहे. हरीश साळवे यांच्यासारखा महागडा वकील त्यासाठी दिला जात आहे. लोया यांच्या मृत्यूची चौकशी होऊ नये असे सरकारला का वाटते, असा सवाल पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.

‘कायदा-सुव्यवस्थेचा बोजवारा’

भीमा-कोरेगावमधील वातावरण बिघडल्याचे आणि एक जानेवारीला दोन लाखांहून अधिक लोक येणार असल्याचे ठाऊक असूनही राज्य सरकारने कसलीही काळजी घेतली नाही. केवळ १८० पोलीस बंदोबस्ताला होते हे कसे, असा सवाल करत तिथे दंगल व्हावी यातच सरकारला रस होता का, असा सवाल राष्ट्रवादी कॉंग्रेसचे गटनेते जयंत पाटील यांनी केला.नागपूर या मुख्यमंत्र्यांच्या शहरातच गुन्हेगारी प्रचंड वाढल्याची टीका त्यांनी केली.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 27-03-2018 at 01:26 IST
ताज्या बातम्या