पृथ्वीराज चव्हाण यांची मुख्यमंत्र्यांवर टीका; सीबीआय चौकशीची मागणी

मंत्रालयात वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या ‘बदल्यांचा बाजार’ मांडण्यात आला असल्याचा आरोप करीत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गुरुवारी विधानसभेत हल्लाबोल केला. एका अधिकाऱ्याची नियुक्ती रोखण्यासाठी माजी मुख्य सचिवांनी सात कोटी रुपये घेतल्याच्या ध्वनिचित्रफीत प्रकरणी सीबीआय चौकशी करा, अशी मागणी चव्हाण यांनी केली.

चव्हाण यांनी याप्रकरणी स्थगन प्रस्तावाची सूचना दिली होती. एका खासगी दूरचित्रवाणीवाहिनीने दाखविलेल्या ध्वनिचित्रफीतीचा उल्लेख चव्हाण यांनी केला. झोपु प्राधिकरणाचे माजी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या संभाषणाच्या ध्वनिचित्रफीतीत त्यांची नियुक्ती रोखण्यासाठी एका बिल्डरने सात कोटी रुपये माजी मुख्य सचिवांनी घेतल्याचे दाखविण्यात आले आहे.

सहारा स्टार हॉटेलवर घातलेल्या धाडीत कोटय़वधी रुपयांचे बिल्डरांनी दिलेले धनादेश आढळून आले. त्यामुळे वरिष्ठ शासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा बाजारच मांडल्याचे दिसून येत आहे. वरिष्ठ व आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या मुख्यमंत्र्यांच्या मंजुरीनेच होतात. त्यामुळे याप्रकरणांमध्ये सरकारने कोणती चौकशी केली आहे, पोलिसांनी काही कारवाई केली आहे का, असे सवाल चव्हाण यांनी उपस्थित केले. यासंदर्भात सीबीआयकडेच चौकशी सोपवावी, अशी मागणीही त्यांनी केली.