मुंबई : विधानसभा निवडणुकीपूर्वी कराड दक्षिण मतदारसंघात मतदारांची ५८ हजार नावे दुबार आढळून आली होती. त्यांची यादी सातारा जिल्हाधिकाऱ्याकडे दिली होती. त्यापैकी ४८ हजार मते आता वगळली गेली आहेत. निवडणुकीपूर्वीच ती काढली गेली असती तर कदाचित निकाल वेगळा लागला असता, अशा शब्दांत राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी २०२४च्या विधानसभा निवडणुक निकालावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. तसेच लोकसभेनंतर विधानसभा निवडणुकीच्या पाच महिन्यात १० टक्के मते कशी वाढली, याचे उत्तर मिळायला हवे, अशी मागणी त्यांनी केली.
सध्या महाराष्ट्रभर मतदारयाद्यांची सखोल तपासणी (एसआयआर) केली जात आहे. त्या पार्श्वभूमीवर विधानसभा निवडणुकीवर भाष्य करताना चव्हाण म्हणाले, २०२४च्या लोकसभा निवडणुकीत महायुतीचा दारूण पराभव झाल्यानंतर पाचच महिन्यात विधानसभेच्या निकालात एवढा मोठा फेरफार कसा झाला? माझ्या दक्षिण कराड मतदारसंघात जेव्हा २०२४च्या एकूण मतदार याद्यांची संगणकाच्या मदतीने तपासणी केली तेव्हा तीन लाख १५ हजार मतदानापैकी एकूण ५८ हजार नावे दुबार असल्याचे आढळून आले. त्यापैकी २७ हजार नावे माझ्या मतदारसंघामध्येच होती.
माझ्या मतदारसंघाशी भौगोलिकदृष्ट्या संलग्नित असलेल्या उत्तर कराडमध्ये बाळासाहेब पाटील, इस्लामपूरमध्ये जयंत पाटील, पलूस कडेगावमध्ये विश्वजीत कदम, पाटणमध्ये शंभूराजे देसाई आणि शिराळात सत्यजीत देशमुख या पाचही मतदारसंघातील मिळून जवळपास २७ ते २८ हजार मतेही दुबार होती. या मतदारांनी पुन्हा पुन्हा मतदान केले असेल तर निवडणुक प्रभावित होऊ शकते. त्यांची यादी जिल्हाधिकाऱ्यांना दिली होती. परंतु, त्यांनी दखल न घेतल्याने ती तशीच राहिली. माझ्याकडे असलेली ही यादी कुणीही तपासू शकतो, असे आवाहन त्यांनी केले. आता यापैकी ४८ हजार नावे वगळण्यात आली आहेत. ती निवडणुकीपूर्वी वगळली गेली असती तर कदाचित निकाल वेगळा असता. कारण, ५६ हजारपैकी काही दुबार मतदारांनी मतदान केले असेल तर त्यामुळे मतदान प्रभावित होऊ शकते,असा दावा त्यांनी केला.
पाच महिन्यात १० टक्के मते कशी वाढली?
लोकसभा निवडणूक झाल्यानंतर अमित शाह नागपूरला गेले होते. त्यावेळी अमित शाह यांनी बैठकीत आपल्या पदाधिकाऱ्यांना १० टक्के मते वाढवा असे सांगितले होते. लोकसभेनंतर पाच महिन्यात विधानसभेला १० टक्के मते वाढली होती. अधिकाऱ्यांना प्रश्न न विचारता मतदारांची नावे नोंदविण्यास सांगण्यात आले होते, असा खळबळजनक आरोप पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.
