मुंबई : खासगी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये २०२६-२७ या शैक्षणिक वर्षामध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागणार आहे. राज्यातील काही खासगी वैद्यकीय महाविद्यालयांनी तब्बल एक लाख रुपयांहून अधिक शुल्कवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाला शुल्क नियामक प्राधिकरणाच्या (एफआरए) नुकत्याच झालेल्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे आता खासगी महाविद्यालयांचे शुल्क तब्बल १७.१३ लाखांपर्यंत पाेहचले आहे.

नीट परीक्षेचा निकाल लागला असून, लवकरच वैद्यकीय अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरू होणार आहे. मात्र, त्यापूर्वीच राज्यातील अनेक खासगी महाविद्यालयांनी त्यांच्या शुल्कामध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. ही वाढ किमान एक लाखापर्यंत आहे. शासनाच्या नव्या राजपत्रानुसार काही संस्थांच्या शुल्क निर्धारणात कंपनीज ॲक्टमधील तरतुदी लागू करण्यात आल्या असून, त्यानुसार शुल्क संरचनेला मंजुरी दिल्याची माहिती शुल्क नियामक प्राधिकरणातील एका सदस्याने दिली.

प्रमुख संस्थाच्या शुल्कात वाढ

नागपूरमधील ‘एनकेपी साळवे इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस अँड रिसर्च सेंटर’ने १.६७ लाखांची वाढ केली आहे. त्यामुळे त्यांचे गतवर्षी असलेले शुल्क १३.९५ लाखावरून १५.६२ लाख रुपये इतके झाले आहे. पालघरमधील ‘वेदांता इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस’ या महाविद्यालयाने जवळपास दीड लाख रुपयांपर्यंत वाढ केली आहे.

या महाविद्यालयाचे गतवर्षीचे शुल्क हे १५.५७ लाख रुपये होते, ते वाढून १७.१३ लाख रुपये इतके झाले आहे. – नाशिकमधील ‘डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालया’चे वार्षिक शुल्क ११.९६ लाख रुपयांवरून १३.१६ लाख रुपये करण्यात आले आहे. सोलापूरच्या ‘अश्विनी ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालया’चे शुल्क १०.३३ लाखांवरून ११.३६ लाख रुपये झाले आहे.

पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमही महागले खासगी वैद्यकीय महाविद्यालयांतील पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या शुल्कातही वाढ करण्यात आली आहे. ‘एनकेपी साळवे इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस अँड रिसर्च सेंटर’ने एमडी अभ्यासक्रमाचे वार्षिक शुल्क ९ लाखांवरून १०.०८ लाख रुपये केले आहे. त्याचबरोबर ‘डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालया’ने ९० हजारांची वाढ केल्याने त्यांचे शुल्क ९ लाखांवरून ९.९० लाख रुपये झाले आहे. तसेच, ‘अश्विनी ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालया’चे शुल्क १२.७६ लाखांवरून १२.९६ लाख इतके झाले आहे.