मुंबई : उन्हाळी सुट्टीत मोठ्या संख्येने नागरिक गावी किंवा पर्यटनासाठी जातात. यंदाही उन्हाळी सुट्ट्या सुरू झाल्याने मुंबईकरांसह ठाणे, नवी मुंबई परिसरातील नागरिकांची गावी जाण्याची लगबग सुरू आहे. एसटीने हंगामी १० टक्के तिकिट दरवाढ केल्यानंतर आता खासगी ट्रव्हल्स कंपन्यांनीही एसटी तिकिटाच्या दीडपट भाडेवाढ केल्याने गावी जाणाऱ्यांचा उन्हाळी प्रवास महागला आहे. सध्या पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात जाण्यासाठी खासगी बसची सर्वाधिक मागणी आहे.
दरवर्षी उन्हाळी सुट्टीत गावी जाण्याचे, पर्यटनासाठी एखाद्या पर्यटनस्थळी जाण्याचे बेत मार्च महिन्यातच आखले जातात. रेल्वेचे तिकिट दोन महिने आधी आरक्षित होत असल्याने गाड्या नेहमीच फुल्ल असतात. तत्काळ तिकिटांची अनिश्चितता कायम असल्याने अनेक प्रवासी खासगी बसकडे मोर्चा वळवतात. प्रवाशांची वाढती मागणी पाहता खासगी ट्रव्हल्सच्या दरात वाढ करण्यात येते. त्याचा फटका सामान्य प्रवाशांना सहन करावा लागतो. उन्हाळी सुट्टीत वाढलेल्या मागणीमुळे खासगी ट्रव्हल्सचे दर १५ ते ३० टक्क्यांनी वाढले आहेत. सध्या कोल्हापूरला जाणाऱ्या वातानुकूलित बसच्या एका तिकिटासाठी २ ते ३ हजार रुपये मोजावे लागत आहेत. आठवडाअखेरीस या तिकीटात आणखी वाढ होते.
खासगी स्लीपरना पसंती
लांब पल्ल्याच्या मार्गावर खासगी शयनयान (स्लीपर) बसला जास्त पसंती आहे. मुंबई – रत्नागिरी, कणकवली, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, सांगली, औरंगाबाद, नागपूर मार्गावरील गाड्यांना मोठी मागणी आहे. रात्रीच्या आरामदायी प्रवासामुळे स्लीपर गाड्यांना प्रवासी पसंती देत आहेत.
समृद्धीमार्गे विदर्भात
समृद्धी महामार्गामुळे विदर्भात जाणे वेगवान झाले आहे. उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेशला जाणाऱ्या ट्रव्हल्स समृद्धी महामार्गावरून जात असून समृद्धी महामार्गावरील वाहतूक वाढली आहे. दिवसाला सुमारे ६० ते ७० खासगी ट्रव्हल्स विदर्भ, अमरावती, नागपूरला जातात. दरम्यान, आता उन्हाळ्यात दररोज १२५ ते १५० खासगी बस विदर्भात जात आहेत.
पश्चिम महाराष्ट्रात दररोज २०० गाड्या
कोल्हापूर, सातार, सांगली, सोलापूर मोठ्या संख्येने प्रवासी जातात. दररोज सुमारे १२५ गाड्या मुंबई महानगरातून पश्चिम महाराष्ट्रात जातात. सध्या खासगी ट्रव्हल्सची संख्या २०० च्या घरात आहे. त्यातच कोल्हापूरचे तिकिट २ ते ३ हजारांच्या घरात पोहोचले आहे.
गोव्याला प्रतीक्षा
सध्या कोकणात नियमित रेल्वेगाड्यांव्यतिरिक्त दररोज ७० खासगी ट्रव्हल्स जात आहेत. कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची संख्या अजून वाढलेली नाही. तसेच गोव्याचा हंगाम देखील सुरू झालेली नाही. मे महिन्याच्या १० तारखेनंतर गोव्याला जाणाऱ्यांची संख्या वाढेल.
एसटीच्या तिकिट दरापेक्षा दीड पट अधिक भाडे आकारण्यास परिवहन विभागाची परवानगी आहे. इंधनदरवाढ, टोल, चालक – वाहकांचे मानधन, देखभाल खर्च आणि हंगामी मागणी या सर्व घटकांमुळे भाडेवाढ अपरिहार्य ठरते. २५ एप्रिल ते २५ मेदरम्यान एक महिना उन्हाळी हंगामापुरती भाडेवाढ आहे. – हर्ष कोटक,सचिव, मुंबई बस मालक संघटना
