खासगी लसीकरण केंद्रांकडे पाठ ; लस उपलब्धता वाढल्याने प्रमाणात घट

मुंबईत आतापर्यंत १ कोटी ३८ लाखांहून अधिक नागरिकांनी लस घेतली आहे.

मुंबई : लसमात्रांची उपलब्धता वाढल्यामुळे ऑक्टोबरमध्ये खासगी लसीकरण केंद्रांवरील नागरिकांचा ओघ घटला आहे. दर दिवशी संपूर्ण मुंबईत होणाऱ्या लसीकरणापैकी जेमतेम २० टक्के लसीकरण खासगी केंद्रांवर होत आहे.

मुंबईत शनिवारी दिवसभरात ७४ हजारांहून अधिक लोकांचे लसीकरण झाले. त्यात केवळ १० हजार ५०० नागरिकांनी खासगी लसीकरण केंद्रांवर लस घेतली. मुंबईत आतापर्यंत १ कोटी ३८ लाखांहून अधिक नागरिकांनी लस घेतली आहे. यापैकी ५० लाखांहून अधिक जणांनी दुसरी मात्रा, तर ८७ लाखांहून अधिक नागरिकांनी पहिली मात्रा घेतली आहे. सुमारे ९७ टक्के नागरिकांनी पहिली मात्रा घेतली आहे. तर ५५ टक्के नागरिकांनी लशीची दुसरी मात्रा घेतली आहे. त्यातही उच्चभ्रू, सुशिक्षित वर्गाचे बहुतांशी लसीकरण झालेले असल्यामुळे खासगी लसीकरण केंद्रांवरील गर्दी आटली आहे.

१८ ते ४५ या वयोगटांसाठी लसीकरण सुरू झाले त्यानंतर मुंबईत जुलै व ऑगस्टमध्ये लशीचा मोठा तुटवडा निर्माण झाला होता. या काळात पालिकेच्या व सरकारी लसीकरण केंद्रांवर मोफत लस मिळत होती. तर खासगी लसीकरण केंद्रांवर मात्र लसमात्रा विकत घ्यावी लागत होती. पालिकेच्या लसीकरण केंद्रांवर  रांगा लावाव्या लागत होत्या. अनेकांची दुसरी लस मात्रा घेण्याची मुदत उलटून जात होती. त्यामुळे नागरिक मोठय़ा संख्येने खासगी लसीकरण केंद्रांकडे वळले होते. त्यामुळे सप्टेंबपर्यंत खासगी लसीकरण केंद्रांवर गर्दी वाढली होती. लसीकरणाचा टक्का वाढवण्यासाठी पालिकेने घेतलेल्या मोहिमांमुळे आता बहुतांशी लोकांची पहिली मात्रा घेऊन झाली आहे. त्यामुळे सध्या पालिकेच्या लसीकरण केंद्रांवरही सहज लस उपलब्ध होत असल्यामुळे साहजिकच खासगी लसीकरण केंद्रांवरील गर्दी आटली आहे.

२३ ऑक्टोबर 

पालिका केंद्रे एकूण मात्रा  : ५९, ५९६

खासगी केंदे एकूण मात्रा  : १०,५७४

२३ सप्टेंबर  

पालिका केंद्रे एकूण मात्रा : २०,३६८

खासगी केंदे एकूण मात्रा  :  ३८,९०६

पालिकेच्या केंद्रांवर..

गेल्या महिन्याभराचा विचार करता पालिकेच्या केंद्रांवर सुमारे १५ लाख ८३ हजार २१७ लोकांचे लसीकरण करण्यात आले, तर खासगी केंद्रावर फक्त ४ लाख ७८ हजार २८५ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले.

* मुंबईतील एकूण केंद्रे : ४६९

* खासगी केंद्रे : १४६

* राज्य, केंद्र सरकारची केंद्रे : १९

* पालिकेची केंद्रे : ३०४

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Private vaccination centres get low response from citizen zws

Next Story
महाबळेश्वर संमेलन अधिकृत, टोरांटो मात्र अनधिकृत!
ताज्या बातम्या