मराठी चित्रपट, नाटक आणि वेबमालिका या तिन्ही माध्यमांमध्ये अभिनेत्री प्रिया बापट आणि अभिनेता उमेश कामत या वास्तवातल्या जोडीला पडद्यावरही एकत्र पाहायला लोकांना खूप आवडतं. करोनाकाळात ‘आणि काय हवं’ या वरुण नार्वेकर दिग्दर्शित वेबमालिकेत त्यांनी एकत्र काम केलं होतं. ही वेबमालिका खूप लोकप्रिय झाली. त्यामुळे आता पुन्हा नवरा-बायको म्हणून त्यांना ‘हे काय नवीन?’ या झी फाइव्हवर प्रदर्शित होणाऱ्या वेबमालिकेत पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. या नव्या वेबमालिकेच्या निमित्ताने प्रिया, उमेश आणि दिग्दर्शक वरुण नार्वेकर यांच्याशी ‘लोकसत्ता’ कार्यालयाला दिलेल्या भेटीदरम्यान गप्पा रंगल्या.
शीर्षकापासूनच ‘हे काय नवीन?’
या वेबमालिकेच्या गमतीशीर शीर्षकामागचा विचार स्पष्ट करताना मालिकेच्या कथाविषयातून सुचल्याचं वरुणने सांगितलं. ‘मालिकेची संकल्पना अशी आहे की आदित्य आणि रमा हे लग्नाला दहा वर्षं झालेलं जोडपं आहे. आणि सगळं स्थिरस्थावर असताना या टप्प्यावर रमा स्वत:चा व्यवसाय सुरू करायचा निर्णय घेते. सर्वसामान्यपणे सगळं सुरळीत सुरू असताना असं काही ऐकल्यानंतर घरच्यांची पहिली प्रतिक्रिया येते ती म्हणजे आता “हे काय नवीन?” तर तिथूनच या वेबमालिकेचं शीर्षक सुचलं. ‘आणि काय हवं’ या वेबमालिकेची प्रिया आणि उमेशबरोबर तीन पर्वं केली, त्यानंतर बराच काळ नवीन एकत्र काही केलं नव्हतं. ‘हे काय नवीन?’ने या सगळ्या गोष्टी जुळून आणल्या, असं वरुणने सांगितलं. ‘हे काय नवीन?’चं स्वरूपही वेगळं आहे. ‘आणि काय हवं’मध्ये प्रत्येक भाग हा वेगवेगळी संकल्पना घेऊन केलेला होता, इथे एक सलग गोष्ट तुम्हाला पाहायला मिळेल, असंही त्याने स्पष्ट केलं.
काम करताना वैयक्तिक नातं आड येत नाही…
प्रेक्षकांच्या आग्रहातूनच नव्या वेबमालिकेचा जन्म झाला, अशी सुरुवात करत उमेशने त्यामागचा किस्सा सांगितला. ‘मी, प्रिया आणि वरुण आम्ही तिघांनी एकत्र काम करावं यासाठी खरं तर प्रेक्षकांनीच खूप आग्रह धरला होता. ‘जर तरची गोष्ट’ हे नाटक आम्ही करतो आहोत, त्या नाटकाच्या प्रत्येक प्रयोगानंतर भेटणाऱ्या आबालवृद्ध प्रेक्षकांची हीच विचारणा असते की ‘आणि काय हवं’ नंतर तुम्ही तिघं पुन्हा एकत्र काम कधी करणार? ‘आणि काय हवं’ ही वेबमालिका तरुण जोडप्यांबरोबरच लहान मुलांनाही इतकी आवडेल, अशी कल्पना आम्ही केली नव्हती. पण, प्रेक्षकांच्या या प्रेमातूनच ‘हे काय नवीन’चा जन्म झाला आहे’, असं उमेशने सांगितलं. त्या दोघांची जोडी वास्तवातही आणि पडद्यावरही लोकप्रिय आहे, पण काम करताना कलाकार म्हणून आम्ही व्यावसायिक वृत्तीनेच वागतो, असं उमेश म्हणतो.
‘सेटवर काम करत असताना आम्ही नवरा-बायको म्हणून नव्हे तर स्वतंत्र कलाकार म्हणून वावरतो. त्यामुळे तिथे आपण करत असलेल्या व्यक्तिरेखेचा शोध घेणं, प्रिया कशा पद्धतीने काम करते आहे हे पाहणं हा सगळा माझ्यासाठी मजेदार अनुभव असतो. वरुणच्या सेटवर जायचं म्हणजे कान उघडे ठेवून तो काय सांगतो आहे, त्यानुसार काम करायचं. सेटवर कलाकार म्हणून आपसूकच आम्ही व्यावसायिक वृत्तीने काम करतो, त्यासाठी काही ठरवावं लागत नाही’, असं उमेशने स्पष्ट केलं. प्रियानेही उमेशच्या म्हणण्याला दुजोरा देत व्यावसायिकदृष्ट्या वेगळं वागण्याची आम्हाला गरजच भासत नाही. कलाकार म्हणून एकमेकांना अवकाश देणं, स्वातंत्र्य देणं, तिथे आपलं नातं आड येणार नाही, याची काळजी घेणं हे आमच्या जडणघडणीतच रुजलेलं आहे, असं सांगितलं.
गोष्टीतून प्रेक्षकांशी भावनिक नातं निर्माण व्हायला हवं…
एकत्र असो वा स्वतंत्रपणे एखादी कलाकृती निवडताना काय विचार केला जातो, यासंदर्भात बोलताना प्रियाने कलाकार किंवा निर्माता म्हणून कुठलीही गोष्ट ऐकताना, जी गोष्ट आपण लोकांसमोर सादर करणार आहोत ती मुळात मला भावते आहे का? मला ती बघायला आवडेल का? आणि त्यातून निखळ मनोरंजन किंवा प्रेरणादायी, त्याच्याशी जोडून घेता येईल असा कुठलाही भाव प्रेक्षकांपर्यंत मी पोहोचवू शकत असेन, तर हा माझ्यासाठी मोठा निकष असतो, असं सांगितलं. ‘रंगमंचावरचं काम असो किंवा पडद्यावरचा अभिनय असो, त्या गोष्टीतून तुम्ही प्रेक्षकांना जोडून घेतलं तर मग तिथे वयाचं बंधन उरत नाही. प्रत्येक वयोगटातला प्रेक्षक वेगवेगळ्या प्रकारे ती गोष्ट पाहतो. तो कदाचित आपल्या मित्राची गोष्ट म्हणून बघतो, आजी-आजोबांनी सांगितलेली गोष्ट, माझी मुलं उद्या हेच करणार आहेत या विचाराने किंवा माझ्या आयुष्यात घडलेलं नसलं तरी समाजात हे घडतं आहे म्हणून का होईना ते पाहतो. त्यामुळे त्या गोष्टीतून प्रेक्षकांबरोबर भावनिक नातं निर्माण व्हायला हवं, हे महत्त्वाचं आहे’, असं तिने सांगितलं.
आक्रमक व्यक्तिरेखा फार काळ टिकून राहात नाहीत…
सध्या आक्रमक पुरुषी व्यक्तिरेखांवर आधारित चित्रपट अधिक चालतात, याबद्दल बोलताना अशा व्यक्तिरेखा आणि हिंसक कथांवर आधारित चित्रपट आपल्याला चटकन आकर्षित करतात, हे खरं आहे. आपल्यातल्या हिंसक प्रवृत्तीला ते प्रभावित करतात, पण ते फार दीर्घकाळ टिकून राहू शकत नाहीत, असं मत वरुणने व्यक्त केलं. ‘शेवटी आपण जे वास्तव आहे त्याकडेच परततो आणि मृदु स्वभावाच्या व्यक्तिरेखा विशेषतः पुरुष व्यक्तिरेखा असायला हव्यात’, असं आग्रही मत त्याने व्यक्त केलं. ‘आजवरच्या चित्रपटांकडे नजर टाकली तर अगदी देव आनंद यांच्यापासून मुख्य प्रवाहातील अनेक कलाकार ज्यांनी मृदु स्वभावाच्या पुरुष व्यक्तिरेखा केल्या तेच अधिक टिकले आहेत. अमिताभ बच्चन यांनी अँग्री यंग मॅन साकारला असला तरी त्यांनीही सर्वसाधारण, प्रेमळ व्यक्तिरेखा साकारण्यावर भर दिला आहे. मला वाटतं तो समतोल आपल्याला साधता आला पाहिजे, शेवटी प्रेक्षक त्या चित्रपटांमधून काय घेतात, हे महत्त्वाचं असल्याचंही वरुणने सांगितलं.
