मुंबई : कौटुंबिक वादामुळे चर्चेत आलेल्या फुके कुटुंबाच्या सून प्रिया फुके यांनी नुकताच राष्ट्रवादीत (शरद पवार) प्रवेश केला. नुकत्याच झालेल्या महापालिकेच्या निवडणुकीत त्या अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुकीच्या आखाड्यात उतरल्या होत्या. त्यांनतर आता राष्ट्रवादीत पक्ष प्रवेश केल्यामुळे पुन्हा चर्चांना उधाण आले आहे. राष्ट्रवादीने (शप) त्यांना नागपूर शहर महिला अध्यक्षपदाची जबाबदारी दिली आहे. काही महिन्यांपूर्वी प्रिया फुके यांनी भाजपचे आमदार व दिर परिणय फुके आणि कुटुंबियांवर मानसिक छळ आणि संपत्ती बळकावल्याचा आरोप केला होता. त्यामुळे राज्यभर त्या चर्चेत आल्या होत्या.

प्रिया फुके यांनी जुलै २०२५ मध्ये परिणय फुके आणि कुटुंबियांविरोधात आक्रमक भूमिका घेत विधान भवनासमोर आंदोलन केले होते. दरम्यान, सासरच्या मंडळींकडून होत असलेल्या जाचामुळे आपल्या दोन लहान मुलांचे भवितव्य टांगणीला लागल्याची खंत व्यक्त त्यांनी व्यक्त केली होती. प्रिया फुके यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्य महिला आयोगाकडेही याबाबत तक्रार केली होती. त्यांनतर शिवसेनेच्या (ठाकरे) सुषमा अंधारे, राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे यांनीही याप्रकरणी प्रिया यांना साथ दिली होती. मी फक्त न्यायासाठी लढत आहे. माझ्या मुलांना सुरक्षित आयुष्य हवे आहे. मला कोणत्याही राजकीय लढाईत रस नाही, असे त्या म्हणाल्या होत्या. मात्र, न्याय मिळत नसल्याने अखेर त्या हळूहळू राजकारणात सक्रिय होऊ लागल्या. नुकत्याच झालेल्या नागपूर महापालिकेच्या निवडणुकीत त्यांनी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला होता. मात्र, त्यांना अपयशाचा सामना करावा लागला. प्रिया फुके यांनी समाजमाध्यमावर काही पुरावे सादर करत दोन चित्रफिती प्रसिद्ध केल्या होत्या. त्यात त्यांनी अत्यंत गंभीर आरोप केले होते. मात्र, काही दिवसांनंतर त्यांनी त्या चित्रफिती समाजमाध्यमावरून काढून टाकल्या.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे व राज्याचे माजी मंत्री अनिल देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवारी प्रिया फुके यांनी राष्ट्रवादीत (शरद पवार) प्रवेश केला. पक्षाच्या मुंबईतील प्रदेश कार्यालयात प्रवेश पार पडला. राज्यसभा खासदार शरदचंद्र पवार यांच्या विकसनशील नेतृत्वावर विश्वास ठेवून खासदार सुप्रियाताई सुळे व महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाची बांधणी व महिलांच्या विकासासाठी तसेच हक्कांसाठी प्रयत्नशील राहील, असे त्या म्हणाल्या. या पक्षप्रवेशामुळे त्या पुन्हा चर्चेत आल्या आहेत.