मुंबई : आफ्रिका खंडातील सर्वोच्च शिखर म्हणजेच माउंट किलीमांजारो (५,८९५ मीटर) सर करण्यासाठी प्रसिद्ध भारतीय गिर्यारोहक प्रियंका मंगेश मोहिते यांच्या नेतृत्वाखाली मुंबईतून रवाना झालेल्या १० जणांनी तिरंगा फडकावला आहे. या १० जणांची गिर्यारोहण मोहीम अंतिम टप्प्यात आली असून क्लाइम्बिंगीनच्या माध्यमातून मारांगू मार्गाने ही मोहीम यशस्वी करण्यात आली.

मुंबईहून ३० सप्टेंबर रोजी प्रवास सुरू करून पथक किलीमांजारो विमानतळावर पोहोचले. त्यानंतर मोशी येथे मुक्काम करून मोहिमेची तयारी, उपकरणांची तपासणी आणि आवश्यक मार्गदर्शन करण्यात आले. पुढील सहा दिवसांत मारांगू गेट, मांडारा हट, होरोम्बो हट आणि किबो हट असा प्रवास करत पथकाने शिखराकडे कूच केले. शिखर ५ ऑक्टोबर रोजी मध्यरात्रीपासून चढाईला सुरुवात करण्यात आली. कडाक्याची थंडी, कमी होत जाणारे प्राणवायूचे प्रमाण आणि आव्हानात्मक उंचीचा सामना करत सहभागी गिर्यारोहकांनी आफ्रिकेतील सर्वोच्च बिंदू उहुरू पीक (५,८९५ मीटर) गाठण्याचे आव्हान स्वीकारले. ते आव्हान चंदन लाल, दिलीप भारितकर, ज्योती उगले, सीमा बायनवार, श्वेता गावडे यांनी पूर्ण केले. तसेच, माधुरी भांगले यांनी स्टेला, तर प्रतीक्षा यांनी गिलमन्स पॉइंट गाठला. सुरक्षित गिर्यारोहण, संघभावना आणि शिस्तीला प्राधान्य देत पथकाने हा टप्पा पूर्ण केला.

साहसासोबतच शारीरिक आणि मानसिक क्षमतेची कसोटी

या मोहिमेचे नेतृत्व करणाऱ्या प्रियंका मंगेश मोहिते या भारतातील नामांकित गिर्यारोहक असून त्यांनी एव्हरेस्ट, ल्होत्से, मकालू, अन्नपूर्णा-१ आणि कांचनजुंगा यांसह जगातील अनेक ८,००० मीटरपेक्षा उंच शिखरांवर यशस्वी चढाई केली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली किलीमांजारो मोहिमेत सहभागी झालेल्या सदस्यांसाठी ही मोहीम साहसासोबतच शारीरिक आणि मानसिक क्षमतेची कसोटी ठरली. शिखर गाठणे हे अंतिम ध्येय असले तरी सुरक्षितपणे परत येणे हेच खरे यश आहे, असे प्रियंका मोहिते म्हणाल्या.