महायुतीतील महत्त्वाचे घटक पक्ष असलेल्या शिवसेना-भाजप या पक्षांमधील जागावाटपाचा तिढा येत्या दोन दिवसात सुटेल अशी आशा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी व्यक्त केली आहे.
जागावाटपाबाबत लवकरात लवकर तोडगा काढावा अशी विनंती करण्याच्या उद्देशाने राजू शेट्टी व राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी भाजपच्या नेत्यांची भेट घेतली. या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना राजू शेट्टी म्हणाले की, “सध्या आम्ही भाजप आणि शिवसेनेमधील दुव्याचे काम करत आहोत. दोन्ही पक्षांना थोडं सबुरीने घेण्याचा सल्ला आम्ही देऊ केला आहे. येत्या दोन दिवसांत जागावाटपाचा तिढा सुटेल अशी आशा आहे. राज्यातील सर्वसामान्य माणसाचा कल सध्या महायुतीच्या बाजूने असल्यामुळे ती अभेद्य राहणे गरजेचे असल्याने त्यादृष्टीनेच आम्ही प्रयत्न करत आहोत.” असेही ते म्हणाले.
दरम्यान, आज दिवसभरात राजू शेट्टींसह सदाभाऊ खोत यांनी दुपारी ‘मातोश्री’वर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. सुमारे तासभर या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. त्यानंतर शेट्टी,जानकर यांनी भाजप नेत्यांचीही भेट घेतली. या भेटीनंतर राजू शेट्टी पुन्हा ‘मातोश्री’वर उध्दव यांच्या भेटीसाठी दाखल झाले होते.