scorecardresearch

शोभायात्रांची लगबग; दोन वर्षांनंतर नववर्ष स्वागतासाठी मिरवणुकांची तयारी

करोना संसर्गामुळे गेली दोन वर्षे निरस वातावरणात पार पडलेल्या गुढीपाडव्याच्या दिवशी नववर्षांचे जंगी स्वागत करण्यासाठी मुंबईतील सांस्कृतिक, सामाजिक आणि राजकीय संघटना/संस्था सरसावल्या आहेत.

gudi-padwa
Gudi Padwa 2022: गुढीपाडव्याचा मुहूर्त आणि गुढी कशी उभारावी जाणून घ्या

मुंबई : करोना संसर्गामुळे गेली दोन वर्षे निरस वातावरणात पार पडलेल्या गुढीपाडव्याच्या दिवशी नववर्षांचे जंगी स्वागत करण्यासाठी मुंबईतील सांस्कृतिक, सामाजिक आणि राजकीय संघटना/संस्था सरसावल्या आहेत. येत्या २ एप्रिल रोजी गिरगाव, लालबाग, गोरेगाव यांसह विविध भागांत शोभायात्रा काढण्यात येणार असून त्यासाठी जय्यत तयारी करण्यात येत आहे. त्याचवेळी पोलिसांकडून परवानगी न मिळाल्याने अनेक संस्थांमध्ये संभ्रम कायम आहे.
मुंबईमध्ये २०१९ मध्ये करोनाचा पहिला रुग्ण सापडला आणि त्यानंतर टाळेबंदी, कडक र्निबध लागू झाले. सर्व कारभार ठप्प झाला. त्यामुळे गुढीपाडव्यानिमित्त आयोजित करण्यात येणाऱ्या शोभायात्रा होऊ शकल्या नाहीत. २०२१ मधील गुढीपाडव्यावर करोनाचे सावट होते. आता करोनाची तिसरी लाट ओसरल्यानंतर र्निबध हटविण्यात आले आहेत. त्यामुळे यंदा गुढीपाडव्या दणक्यात साजरा करण्याची तयारी मुंबई आणि लगतच्या शहरांमध्ये सुरू झाली आहे. गिरगाव, लालबाग, खार, गोरेगाव आदी भागातील विविध संस्थांचे कार्यकर्ते शोभायात्रांच्या तयारीत व्यस्त आहेत.
करोनाची तिसरी लाट ओसरली असली तरी योग्य ती काळजी घेऊन यंदाचा गुढीपाडवा साजरा करण्याचा निर्धार करण्यात आला आहे. गिरगाव, लालबागखालोखाल गोरेगाव परिसरात शोभायांत्रांची तयारी सुरू झाली आहे. आयोजनासाठी कार्यकर्त्यांच्या बैठका सुरू आहेत. मात्र गिरगावातील स्वामी विवेकानंद युवा प्रतिष्ठानने यंदा शोभायात्रा काढण्याऐवजी बंदिस्त सभागृहामध्ये गुढीपाडव्यानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्याचा निर्णय घेतला आहे.
करोनाच्या पार्श्वभूमीवर गुढीपाडवा साजरा करण्याबाबत प्रशासनाने अद्याप नियमावली जाहीर केलेली नाही. त्यातच ८ एप्रिलपर्यंत १४४ कलम लागू आहे. ही बाब लक्षात घेऊन गिरगावातील एखाद्या सभागृहामध्ये यंदा गुढीपाडवा साजरा करण्यात येईल, असे स्वामी विवेकानंद युवा प्रतिष्ठानने जाहीर केले आहे. तर दरवर्षीप्रमाणे यंदाही शिवसेनेतर्फे गिरगावात शोभायात्रा काढण्यात येणार आहे. शोभायात्रेत विविध विषयांवरील चित्ररथ समाविष्ट करण्यात येणार आहेत. तसेच शोभायात्रेच्या निमित्ताने आरोग्य, सामाजिक प्रश्नांबाबत जनजागृती करण्यात येणार आहे. वर्षी गुढीपाडव्यानिमित्त गोरेगावामध्ये मिरवणूक काढण्यात येणार असून ‘गोकुळधाम शोभायात्रे’च्या वतीने ‘महाराष्ट्र देशा’ या संकल्पनेवर मिरवणूक काढण्यात येणार आहे. मिरवणुकीसाठी पोलिसांची परवानगी असल्याचे गोकुळधाम शोभायात्राचे सदस्य कौस्तुभ सांळुखे यांनी सांगितले. ही मिरवणूक हनूमान मंदिर, आरएमएमएस सेक्टर लेन दोन, पीएमसी बॅंक कॉर्नर येथून गणेश मैदानात दाखल होणार आहे. नेहमीप्रमाणे चित्ररथ, ढोलताशे, लेझीम, दुचाकींच्या रॅलीचा शोभायात्रेत समावेश असेल, असे गोकुळधाम शोभायात्राचे सदस्य कुणाल आणि अक्षय सावंत यांनी सांगितले.
लालबाग येथेही शोभायात्राचे आयोजन करण्यात आले असून ‘गिरणगाव सांस्कृतिक प्रतिष्ठान’तर्फे लालबाग-परळ परिसरात छोटय़ाशा प्रमाणात करण्याचे ठरविले आहे. या शोभायात्रेत बुलेटस्वारांचे पथक, भारतामाता पालखी तसेच लेझीम पथकांचा समावेश असणार असल्याची माहिती प्रतिष्ठानचे कार्यकारी प्रमुख शशिकांत दळवी यांनी दिली. हिंदू नववर्षांचे स्वागत करण्यासाठी खार येथील ‘नववर्ष स्वागत यात्रा समिती’तर्फेही सकाळी ८ वाजता निर्मल नगर येथील श्री राम मंदिरातून शोभायात्रा सुरू करण्यात येणार आहे. यंदा खार पूर्व परिसरात ५० मोठय़ा गुढय़ा उभारण्याचा मानस असून शोभा यात्रेदरम्यान संपूर्ण खार पूर्व विभागात रांगोळय़ा काढण्यात येणार आहेत.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Procession preparations new year gudi padwa 2022 reception two years corona amy

ताज्या बातम्या