मुंबई : प्रसिद्ध दूरचित्रवाणी निर्मात्या मंजू सिंग यांचे गुरुवारी सकाळी ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्या ७४ वर्षांच्या होत्या. त्यांच्यावर शनिवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. नामवंत दिग्दर्शक ह्रषिकेश मुखर्जी यांच्या गोलमाल या लोकप्रिय चित्रपटातून त्यांनी रत्ना ही व्यक्तिरेखा निभावली होती. त्यांच्या पश्चात त्यांच्या दोन मुली आणि एक मुलगा असा परिवार आहे. 

मंजू सिंग यांनी १९७९ साली आलेल्या गोलमाल या चित्रपटात अमोल पालेकरांच्या म्हणजेच रामप्रसाद दशरथप्रसाद शर्मा यांच्या बहिणीची रत्ना शर्मा नामक भूमिका केली होती. त्यानंतरही त्यांनी हिंदी चित्रपटांतून सइहाय्यक भूमिका केल्या होत्या. त्यापैकी हंकी पंकी (१९७९), लेडीज टेलर (१९८१), स्क्रीन टू (१९८५) या चित्रपटांतील त्यांच्या भूमिका विशेष गाजल्या. त्यानंतर त्यांनी अनेक वर्षे हिंदी दूरचित्रवाणी मालिकांची निर्मिती केली. मंजू सिंग यांना प्रेमाने सिनेसृष्टीत मंजू दीदी म्हणून संबोधले जायचे. गीतकार स्वानंद किरकिरे यांनी मंजू यांना ट्विटरवरून श्रद्धांजली वाहिली.

भारतीय दूरचित्रवाणीत मोलाचे योगदान

मंजू सिंग यांनी अनेक उत्तमोत्तम दूरदर्शनवरील मालिकांची निर्मिती केली. ऐंशीच्या दशकात त्यांनी स्वराज, एक कहानी, शो टाईम अशा  लोकप्रिय मालिकांची निर्मिती केली होती. त्याचप्रमाणे सात वर्षांसाठी त्यांनी ‘खेल खिलोने’ या लहान मुलांच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालनही केले होते. मंजू सिंग यांनी त्यांच्या मालिकांतून सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर प्रकाश टाकला. त्यांनी शो टाईम या मालिकेतून दूरचित्रवाणीत निर्माती म्हणून आपल्या करिअरला सुरुवात केली. त्यांचा एक कहानी हा कार्यक्रम अनेक प्रादेशिक भाषांमधील साहित्यिक लघुकथांवर आधारित होता तसेच अधिकार ही मालिका महिलांच्या कायदेशीर हक्कांवर आधारित होती. त्यांनी सम्यकत्व: ट्रू इनसाइट नावाचा अध्यात्मावरील कार्यक्रमदेखील सादर केला. २०१५ साली त्यांना  त्यांच्या कला आणि शैक्षणिक क्षेत्रातील योगदानासाठी केंद्र सरकारने केंद्रीय शिक्षण सल्लागार मंडळ (सीएबीई) येथे सदस्य म्हणून नामांकित केले होते.