ग्राहकांकडून फारसा प्रतिसाद नाही

निश्चलनीकरणाआधीपासूनच मंदीचे ग्रहण लागलेल्या रिअल इस्टेट क्षेत्रात वेगवेगळ्या मार्गानी वित्तपुरवठा मिळविण्याचा विकासकांकडून प्रयत्न असतो. प्रामुख्याने खासगी बँकांशी साटेलोटे करून विकासक ग्राहकांसाठी अनेकविध वित्तयोजना उपलब्ध करून देऊन त्याद्वारे आपल्या प्रकल्पासाठी वित्तपुरवठा निर्माण करतात; परंतु गेल्या एक-दोन वर्षांत विविध कारणांमुळे रखडलेल्या प्रकल्पांमुळे या खासगी बँकांनीही हात आखडता घेतल्यामुळे छोटय़ा विकासकांची पंचाईत झाली आहे. त्यावर पर्याय म्हणून बँकेतर खासगी वित्तसंस्थांनी ‘प्रोफाइल फंडिंग’चा नवा फंडा बाजारात आणला आहे.

मुंबई, ठाणे, नवी मुंबई आदी परिसरांत सध्या मोठय़ा प्रमाणावर गृहप्रकल्प सुरू आहेत. बडय़ा विकासकांच्या प्रकल्पांसाठी बँकांकडून वित्तपुरवठा उपलब्ध असला तरी छोटय़ा विकासकांना बँकांकडून वित्तपुरवठा होण्यात अडचणी आहेत. बँकाही अशा विकासकांवर विश्वास ठेवत नाहीत. त्यामुळे त्यांना बँकेतर वित्तीय संस्था वा खासगी बँकांचा आश्रय घ्यावा लागतो; परंतु खासगी बँकाही छोटय़ा विकासकांना वित्तपुरवठा करताना खूपच काटेकोर असतात. अशा वेळी खासगी वित्तीय संस्था हाच पर्याय राहतो; परंतु या वित्तीय संस्था गृहप्रकल्पाला थेट वित्तपुरवठा करीत नाहीत. त्यामुळे या वित्तीय संस्थांनी सध्या ‘प्रोफाइल फंडिंग’ असा नवा फंडा राबवत घर खरेदीदारांना लक्ष्य केले आहे. या योजनेला ग्राहकांकडून अजून फारसा प्रतिसाद मिळालेला नाही, याकडे एका विकासकाने लक्ष वेधले.

काय आहे प्रोफाइल फंडिंग?

वित्तीय कंपन्यांचा एजंट घर खरेदी करण्यास इच्छुक असलेल्या ग्राहकाला ‘प्रोफाइल फंडिंग’मार्फत योजना देतो. संबंधित ग्राहकाच्या क्षमतेनुसार हा एजंट अनेकविध परिसरांतील घरांचा पर्याय देतो. या घरासाठी सदर ग्राहकाने फक्त दहा टक्के रक्कम भरायची आणि उर्वरित ९० टक्के रक्कम कर्जरूपाने या वित्तसंस्थेने देऊ केली असली तरी त्याने घराचा ताबा जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत हप्ता भरायचा नाही, असे सांगितले जाते. हा हप्ता संबंधित विकासक भरेल. या योजना हक्काचे घर खरेदी करणाऱ्याला आकर्षक वाटत आहेत. मात्र संबंधित विकासक प्रकल्प वेळेत पूर्ण करू न शकल्यास त्याची जबाबदारी संबंधित ग्राहकावर येऊ शकते; परंतु त्याचीही काळजी करण्याची गरज नाही, असे हा एजंट सांगतो. तुम्हाला शक्य झाले नाही तर आम्हीच ते घर विकून टाकू, असेही सांगितले जाते.

डाकमी व्याजाने वित्तपुरवठा झाला तर तो विकासकांना हवाच आहे. खासगी वित्तसंस्था वा बँकांकडून वित्तपुरवठा करताना अनेक अटींची पूर्तता करावी लागते. त्यापेक्षा ग्राहकांमार्फत गृहकर्जाद्वारे मिळालेला वित्तपुरवठा कमी व्याजदरात मिळतो. त्यामुळे असा निधी मिळाला तर तो विकासकांना हवा आहे. त्याला वित्तसंस्थांकडून वेगवेगळी नावे दिली जातात. ‘प्रोफाइल फंडिंग’ कदाचित त्याचेच गोंडस नाव असावे.   आशुतोष लिमये, संशोधन विभागाचे राष्ट्रीय प्रमुख, जोन्स लँग लासेले