पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या वतीने उद्यापासून पु.ल.जन्मशताब्दी महोत्सव २०१८ ला प्रारंभ होत आहे. पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी येथे ८ ते १८ नोव्हेंबर, २०१८ या कालावधीमध्ये पु.ल.जन्मशताब्दी महोत्सव साजरा होणार आहे.

सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते तसेच खासदार राहुल शेवाळे, आमदार सदा सरवणकर आणि सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव भूषण गगराणी यांच्या प्रमुख उपस्थितीत ८ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७ वा. पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, रविंद्र नाट्य मंदिर, प्रभादेवी येथे हा कार्यक्रम होणार आहे.

पु.ल.जन्मशताब्दी महोत्सव – २०१८ मध्ये, यंदाचे जन्मशताब्दी वर्ष असलेले महाराष्ट्राचे ज्येष्ठ संगीतकार सुधीर फडके, ज्येष्ठ गीतकार ग. दि. माडगूळकर आणि लाडके व्यक्तिमत्त्व पु. ल. देशपांडे यांच्या विचारावर, कार्यावर व जीवनावर आधारित विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. महोत्सवात होणाऱ्या विविध कार्यक्रमांबरोबरच फोटो, दृकश्राव्य चित्रफीती, रांगोळी व पुस्तकांचे प्रदर्शनही या काळात रसिकांसाठी उपलब्ध होणार आहे. उदघाटनाच्या दिवशी म्हणजेच ८ नोव्हेंबर, रोजी सायंकाळी ७.३० वाजता “वक्ता दशसहस्त्रेशु” हा पु.ल.देशपांडे यांच्या दुर्मिळ भाषणांचा दृकश्राव्य कार्यक्रम आशय फिल्मस् कल्ब आणि पु.ल.कुटुंबियांच्या वतीने सादर होणार आहे.

सुधीर फडके यांच्या संगीतावर आधारित असलेला “जुळल्या सगळ्या त्या आठवणी” हा दृकश्राव्य कार्यक्रम स्वानंदी, पुणे तर्फे आणि बाबूजी, गदिमा व पुलंवर आधारित संगीत, नृत्य व नाट्यमय कार्यक्रम “गाऊ त्यांची आरती” हा कार्यक्रम शनिवार, १० नोव्हेंबर रोजी होणार आहे. या कार्यक्रमात त्यागराज खाडिलकर, हेमांगी कवी, आप्पा वढावकर, प्रज्ञा कोळी, प्रमोद रानडे, माधुरी करमरकर, अरुण नलावडे हे सहभागी होणार आहेत.

११ नोव्हेंबर रोजी अतुल परचुरे, आनंद इंगळे,पुष्कर श्रोत्री, अजित परब इत्यादी कलाकारांचा समावेश असलेले “आम्ही आणि आमचे बाप” हे मराठी नाटक रवींद्र नाट्य मंदिर मध्ये दु. ४ वाजता तर पु.ल. लिखित “सदू आणि दादू” हा मराठी दीर्घांक संकल्प थिएटर च्या वतीने मिनी थिएटरमध्ये सायंकाळी ७ वाजता आयोजित करण्यात आले आहे. सुनिता तारापुरे आणि रजनीश जोशी हे “बहुरुपी पु.लं. ” या कार्यक्रमातून अभिवाचन पार्श्वसंगीत व पु.ल. च्या व्यक्तिचित्राचे मिनी थिएटरमध्ये सायंकाळी ६ वाजता सादरीकरण करणार आहेत. त्याचबरोबर प्रमोद पवार, अमोल बावडेकर, संपदा माने, ऋतुजा बागवे इ. कलाकारांचा सहभाग असलेला “सुजनहो” हा कार्यक्रम १२ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७.३० वाजता रवींद्र नाट्य मंदिरमध्ये होणार आहे. या कार्यक्रमाची प्रस्तावना ज्येष्ठ साहित्यिक डॉ. अरुणाताई ढेरे यांची असून सदर कार्यक्रम हा पु.लं. च्या भाषणांवर आधारित आहे.

१३ नोव्हेंबर रोजी ६ वाजता मिनी थिएटर मध्ये “आनंदयात्री” ही अतुल परचुरे यांची विजय केंकरे यांनी घेतलेली मुलाखत तर रवींद्र नाट्य मंदिरमध्ये सायंकाळी ७ वाजता ग.दि. मांडगूळकरांच्या कार्यावर व विचारांवर आधारित “गदिमान्य” हा कार्यक्रम सादर होणार असून त्यात रेश्मा कारखानीस, दत्तप्रसाद जोग, सुमित्र माडगुळकर, रसिका गुमास्ते आणि मेघा घाडगे करणार आहेत.

१४ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता मिनी थिएटर मध्ये पु.ल. लिखित “मराठी वाड्मयाचा गाळीव इतिहास” हे मराठी नाटक पार्थ थिएटर यांच्या वतीने सादर करण्यात येणार आहे. तर रवींद्र नाट्य मंदिर मध्ये सायंकाळी ७.३० वाजता पु.लं. च्या मिश्किल पण अप्रकाशित पत्रांच्या अभिवाचनाचा आविष्कार “पुलंच पोष्टिक जीवन” या कार्यक्रमातून सादर होणार असून त्यात‍ गिरीष कुलकर्णी, मिलिंद जोशी, प्रवीण जोशी आणि मधुरा वेलणकर यांचा सहभाग असणार आहे.

१५ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता मिनी थिएटर मध्ये पु.ल.देशपांडे यांनी संगीत दिलेल्या “संगितीका बिल्हाण” हा कार्यक्रम संजीव चिम्मलगी, अपर्णा केळकर, केदार केळकर इ. सादर करणार आहेत तर रवींद्र नाट्य मंदिरमध्ये सायंकाळी ७.३० वाजता अभिवाचन, गायन व दृश्यफितींवर आधारित व डॉ. गिरीश ओक, विजय कोपरकर, प्रियांका बर्वे आणि सुप्रिया चित्राव यांचा सहभाग असलेला “गुण गाईन आवडी” हा कार्यक्रम सादर होणार आहे.

१६ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता मिनी थिएटर मध्ये “एक झुंज वाऱ्याशी” हे मराठी नाटक सादर होणार असून त्यात आशुतोष घोरपडे, श्रीनिवास नार्वेकर, शोभना मयेकर आणि दीपक करंजीकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. तसेच रवींद्र नाट्य मंदिरमध्ये सायंकाळी ७.३० वाजता तरुण कलावंताच्या नजरेतून पुलंच अनोख दर्शन घडविणारा “पुलब्रेशन” हा कार्यक्रम सादर होणार आहे.

१७ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७.३० वाजता रवींद्र नाट्य मंदिरमध्ये पु.ल. व सुनिताबाईंच्या काव्य प्रेमाची आनंदयात्रा, “कवितांजली” या कार्यक्रमातून डॉ. अरुणाताई ढेरे, डॉ. विणा देव, संदिप खरे आणि जितेंद्र जोशी हे सादर करणार आहेत. १८ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७.३० वाजता पुलंच्या आठवणींवर आधारित “पुलंची मुशाफिरी” हा कार्यक्रम रवींद्र नाट्य मंदिरमध्ये महोत्सवाच्या समारोपाच्या दिवशी सादर होणार असून त्यात मधु मंगेश कर्णिक, सतीश आळेकर, प्रमोद रानडे, मंदार कुलकर्णी, राहुल सोलापूरकर आणि जब्बार पटेल सहभागी होणार आहेत.

या महोत्सवात रांगोळी प्रदर्शनाचे विशेष आकर्षण राहणार आहे तसेच महोत्सवात आयोजित केलेल्या पुस्तक प्रदर्शनात अनेक नामांकिंत व लोकप्रिय संस्था सहभागी होणार असून त्यातून रसिकांना सवलतीच्या दरात पुस्तके उपलब्ध होणार आहेत. या पुस्तक प्रदर्शनात, ग्रंथाली, राजहंस, रोहन, मौज, सहित, डिंप्पल, मॅजेस्टीक, लोकवाड्.मय, ज्योस्त्ना, पॉप्युलर, परममित्र, विवेक व राज्य मराठी विकास संस्था सहभागी होणार आहेत. त्याच बरोबर पुलंच्या जीवनातील विविध आठवणी ताजे करणारे छायाचित्रांचे प्रदर्शन देखील अकादमीतील कलादालन येथे आयोजित करण्यात आले आहे. छायाचित्राच्या प्रदर्शनासोबतच पुलंची निवडक भाषणे, एकपात्री प्रयोग, नाटके व चित्रपट यांच्या दृकश्राव्य चित्रफिती देखील दाखविण्यात येणार आहेत.

पु.ल.जन्मशताब्दी महोत्सव –२०१८ अंतर्गत पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीमधील रवींद्र नाट्य मंदिराच्या आवारात सादर होणाऱ्या विविध कार्यक्रमांचा आणि प्रदर्शनाचा आस्वाद रसिकांनी घ्यावा असे आवाहन सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे यांनी केले आहे.