मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) ठाण्यातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडविण्यासाठी हाती घेतलेल्या बाळकुम – गायमुख ठाणे खाडी किनारा रस्ता (मार्ग) प्रकल्पाच्या खर्चात दुपटीने वाढ झाली आहे. या प्रकल्पासाठी १३१६.१८ कोटी रुपये खर्च अपेक्षित होता. आता मात्र हा खर्च थेट २६७४ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. ‘एमएमआरडीए’च्या १५४ व्या बैठकीत या प्रकल्पाच्या सुधारित खर्चाच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> मुंबई : ‘सीएसएमटी’ स्थानकाची सुरक्षा वाऱ्यावर; स्थानकाच्या प्रवेशद्वाराजवळील बॅग स्कॅनर यंत्रणा धूळखात

बाळकुम – गायमुख दरम्यान १३.१४ किमी लांबीचा ठाणे खाडी किनारा रस्ता प्रकल्पाच्या प्रस्तावास २०२१ मध्ये प्राधिकरणाच्या १५१ व्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. या प्रकल्पासाठी १३१६.१८ कोटी रुपये इतका खर्च गृहीत धरण्यात आला होता. मात्र आता प्रकल्प व्यवस्थापन सल्लागाराने आराखडा सादर केल्यानंतर खर्चात थेट दुपटीने वाढ झाली आहे. ठाणे खाडी किनारा रस्ता प्रकल्पासाठी २६७४ कोटी रुपये इतका निधी लागणार आहे. प्रकल्पाची पुढील कार्यवाही करण्याकरीता एमएमआरडीएने सुधारित खर्चाचा प्रस्ताव प्राधिकरणाच्या १५४ व्या बैठकीत मांडला होता. या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. सल्लागाराच्या आराखड्यानुसार हा रस्ता किनारपट्टी नियमन क्षेत्र (सीआरझेड) आणि बफर झोनमधूनही जाणार आहे. त्यामुळे अशा ठिकाणी रस्त्याचे स्टील्टवर बांधकाम करावे लागणार आहे. तर भूवैद्यानिक सर्वेक्षणानुसार अनेक ठिकाणी दलदल आणि खार जमीन आहे. अशा ठिकाणी रस्त्याचे काम करण्यासाठी जमिनीची भूधारण क्षमता वृद्धिंगत करणे आवश्यक आहे. यासाठी ‘परफोरेटेड व्हर्टिकल ड्रेन’ तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. एकूणच या कामामुळे प्रकल्पाचा खर्च वाढल्याचे ‘एमएमआरडीए’ने नमूद केले आहे.

हेही वाचा >>> “सध्या राजकारणात प्रभू श्रीरामाचं नाव घेऊन दगड तरंगतायत”, उद्धव ठाकरेंचा टोला!

कळवा खाडीवर पूल बांधवा लागणार आहे. तर नागला बंदर येथे टेकडी खोदून रस्ता पुढे न्यावा लागणार आहे. तसेच अनेक ठिकाणी छोटे पुलही उभारावे लागणार आहेत. म्हत्त्वाचे म्हणजे मोठ्या प्रमाणावर भूसंपादनही करावे लागणार आहे. तर विविध प्रकारच्या परवानग्याही घ्याव्या लागणार आहेत. यामुळे खर्च वाढला असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

असा आहे ठाणे खाडी किनारा रस्ता प्रकल्प

बाळकुम – गायमुख ठाणे खाडी किनारा मार्ग

१३.१४ किमी लांबीचा सागरी रस्ता (मार्ग)

एकूण सहा मार्गिका

४०/४५ मीटर रुंदी

२६७४ कोटी रुपये खर्च (सुधारित)

बाळकुमजवळील खारेगाव येथून सुरू होऊन घोडबंदर रस्त्यावरील गायमुख येथे संपेल

बाळकुम, कोलशेत, वाघबीळ, ओवळा, कासारवडवली, मोघरपाडा येथून सागरी मार्ग जाईल

५,८९,१५२.७० चौरस मीटर क्षेत्र संपादित करण्याची गरज एक उड्डाणपूल, एक भुयारी मार्ग, ३ किमीचा स्टील्ट रस्ता असे प्रकल्पाचे स्वरूप

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Project cost become doubled for 13 km long balkum to gaimukh coastal road in thane mumbai print news zws
First published on: 30-03-2023 at 18:34 IST