वसईतील मालमत्तेसाठी प्राधिकरणाकडून ‘बँक ऑफ इंडिया’ला हिरवा कंदिल

बँकांनी वितरित केलेले कोटय़वधी रुपयांचे कर्ज एकीकडे बुडीत खात्यात जमा होत असतानाच बँक ऑफ इंडियाला मात्र आपल्या सुमारे ५० कोटी रुपयांच्या कर्जवसुलीसाठी आरएनए बिल्डर्सची वसईतील मालमत्ता ताब्यात घेऊन ती विकण्याची अनुमती कर्जवसुली प्राधिकरणाकडून मिळाली आहे. मात्र वसईतील या मालमत्तेला मंदीच्या काळात ग्राहक मिळाला तरच प्रत्यक्षात कर्जाची वसुली होणार आहे.

बांधकाम व्यवसायाला मंदीचे ग्रहण लागल्यामुळे अनेक विकासक कर्जाच्या खाईत बुडाले आहेत. आरएनए कॉर्पोरेशननेही बँक ऑफ इंडियाकडून कर्ज घेतले होते. त्यासाठी मलबार व खंबाला हिल तसेच वरळी आणि कांदिवलीतील मोक्याच्या ठिकाणी असलेल्या मालमत्ता तारण म्हणून ठेवल्या होत्या. परंतु कर्ज फेडण्यात अपयश आल्याने बँक ऑफ इंडियाने मुख्य महानगर दंडाधिकाऱ्यांकडे अर्ज करून तारण ठेवलेल्या मालमत्ता ताब्यात घेण्याची परवानगी मागितली. मुख्य महानगर दंडाधिकारी चकोर बाविस्कर यांनी ऑगस्टमध्ये तसे आदेश दिले. परंतु या आदेशाला आरएनए कॉर्पोरेशनने कर्जवसुली प्राधिकरणाकडे आव्हान दिले. या मालमत्तांच्या मोबदल्यात वसईतील सुमारे ४६ हजार चौरस मीटर इतकी मालमत्ता विकण्याची तयारी दाखविली. ती मान्य करीत कर्जवसुली प्राधिकरणाचे प्रभारी अध्यक्ष एच. व्ही. सुब्बाराव यांनी ही मालमत्ता ताब्यात घेण्याची अनुमती दिली. याबाबतची सुनावणी आता २८ जानेवारी २०१७ रोजी होणार आहे.

आरएनए कॉर्पोरेशनमार्फत मुंबईत अनेक ठिकाणी टॉवर्सची बांधकामे सुरू आहेत. म्हाडा पुनर्विकास प्रकल्पातही आरएनए कॉर्पोरेशनकडे अनेक प्रकल्प आहेत. आरएनएचे सर्वेसर्वा अनिलकुमार अग्रवाल यांच्या निधनानंतर यापैकी अनेक प्रकल्पांचे काम रखडले. मात्र त्यांचे पुत्र अनुभव अग्रवाल यांनी (पान ९ वर)

बँकेचे कर्ज फेडण्याची आमची इच्छा आहे. कर्जाची जी रक्कम आहे तेवढी रक्कम बाजारभावानुसार वसईच्या मालमत्तेला येते. त्यामुळे आम्ही वसईची मालमत्ता विकून कर्ज फेडण्याची तयारी दाखविली. त्यास कर्जवसुली प्राधिकरणाने मंजुरी दिली आहे. कर्ज बुडविण्याचा आमचा कोणताही मानस नाही. रखडलेले प्रकल्प आम्ही पूर्ण करणारच.

अनुभव अग्रवाल, व्यवस्थापकीय संचालक, आरएनए कॉर्पोरेशन.