नवी दिल्ली : भाजपच्या तत्कालीन प्रवक्त्या नूपुर शर्मा यांनी प्रेषित मोहम्मद यांच्यासंदर्भात केलेल्या वादग्रस्त वक्तव्यप्रकरणी पत्रकार नाविकाकुमार यांच्याविरुद्धही शर्मा यांच्याप्रमाणे ठिकठिकाणी गुन्हे दाखल झाले होते. हे सर्व गुन्हे दिल्ली सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी दिल्ली पोलिसांकडे हस्तांतरित केले. नूपुर शर्मानी ज्या दूरचित्रवाणी वाहिनीवरील कार्यक्रमात हे वादग्रस्त वक्तव्य केले, त्या वेळी नाविकाकुमार या चर्चेचे सूत्रसंचालन करत होत्या.

न्यायमूर्ती एम. आर. शहा आणि कृष्णा मुरारी यांच्या खंडपीठाने सांगितले, की नाविकाकुमार यांच्याविरुद्ध आठ आठवडय़ांपर्यंत अटकेसारखी कोणतीही प्रतिबंधात्मक कारवाई केली जाणार नाही. या काळात त्या आपल्या बचावासाठी प्रयत्न करू शकतील. त्यांनी नाविकाकुमार यांना हे गुन्हे रद्द करण्यासाठी दिल्ली उच्च न्यायालयात दाद मागण्याची परवानगी दिली.

या प्रकरणी नाविका कुमार यांच्याविरुद्ध दाखल होणारे गुन्हे आता दिल्ली पोलिसांकडे पाठवले जातील. दिल्ली पोलिसांची ‘इंटेलिजन्स फ्यूजन आणि स्ट्रॅटेजिक ऑपरेशन्स’ शाखा (आयएफएसओ) या प्रकरणाची चौकशी करेल. न्यायालयाने ८ ऑगस्ट रोजी नाविकाकुमार यांना अटकेच्या कारवाईपासून तात्पुरता दिलासा दिला होता. नाविकाकुमार यांच्याविरुद्ध सुरू केलेली कारवाई रद्द करण्याच्या याचिकेवर खंडपीठाने केंद्र, प. बंगाल सरकार आणि इतरांना नोटिस बजावली होती.