शिवाजीपार्क येथील स्मशानभूमीत दादर आणि परिसराव्यतिरिक्त इतर ठिकाणाच्या करोना मृताचा अंत्यविधी करण्यात येतो आणि त्याचा रहिवाशाना मात्र मोठा त्रास होतो. शिवाय या स्मशानभूमीच्या बाहेर रुग्णवाहिकेच्या रांगा लागलेल्या असतात. याचा त्रास होत असल्याचं अनेकदा सांगूनही प्रशासन ऐकत नसल्याने आज, सोमवारी रहिवाशांनी मूक आंदोलन केले. या आंदोलनाला मनसेने पाठींबा दिला. जर प्रशासनाने दखल घेतली नाही तर मनसे स्टाईल आंदोलन करू असा इशारा मनसे विभाग अध्यक्ष यशवंत किल्लेदार यांनी दिला आहे.
मुंबईत करोनामुळं मृत्यू होण्याचं प्रमाण दिवसागणिक वाढतच आहे. मृत्यू झालेला करोनाबादित कोणत्याही भागातील असला तरी मृत्यूनंतर त्याला जवळच्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी नेहले जाते. बीएमसीची सर्व मोठी रुग्णालयं मुंबईत असल्यानं साहजिकच करोनाचे अनेक मृतदेह शिवाजी पार्क स्मशानभूमीत आणले जात आहेत. स्थानिक नागरिकांनी त्यावर आक्षेप घेतला आहे. दिवसाला २५ ते ३० अंत्यविधी होत असल्याने येथे प्रदूषण वाढलं आहे. त्यामुळं त्वचा विकार व श्वसनाचे आजार वाढले आहेत, अशी स्थानिकांची तक्रार आहे. याकडं लक्ष वेधण्यासाठी स्थानिक नागरिक आज रस्त्यावर उतरले होते. स्वच्छ श्वास हा आमचा अधिकार आहे… मृतदेह बोलू शकत नाहीत, म्हणून आम्ही बोलतोय… एक पाऊल, स्थानिकांच्या निरोगी आयुष्यासाठी… अशा कल्पक घोषणा असलेले फलक त्यांच्या हाती होते.