मनसेने केलेल्या सर्व सूचनांचा विचार करून आखलेले नवे टोलधोरण निवडणूक आचारसंहितेपूर्वीच लागू करण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले असले तरी जोवर ते प्रत्यक्षात येत नाही तोवर टोलविरोधी आंदोलन सुरुच राहील, असे राज ठाकरे यांनी गुरुवारी मुख्यमंत्र्यांसमवेत झालेल्या चर्चेनंतर ‘कृष्णभुवन’ या निवासस्थानी पत्रकार परिषदेत जाहीर केले. मनसेचे कार्यकर्ते टोल भरणार नाहीतच, पण जनतेनेही टोल भरू नये, ठेकेदारांनी धमकावून वसुली केल्यास मनसेला कळवावे, आम्ही कंत्राटदाराच्या घरी जाऊन थैमान घालू अशी खणखणीत धमकीच राज यांनी दिली.
मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक भूमिका घेतल्यामुळे येत्या २१ जानेवारीचा मोर्चा रद्द करत असल्याचेही ते म्हणाले.   मनसेने बुधवारी केलेल्या राज्यव्यापी टोलविरोधी आंदोलनानंतर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिलेल्या निमंत्रणानुसार आज राज ठाकरे, आमदार बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई तसेच संजय शिरोडकर यांनी सह्य़ाद्री अतिथीगृहात झालेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांसमोर टोलसंदर्भात विस्तृत सादरीकरण केले. बैठकीत मुख्यमंत्र्यांच्या देहबोलीवरून ते या प्रश्नावर गंभीर असल्याचे जाणवले, असेही राज म्हणाले.
दहा कोटींपेक्षा कमी खर्च असलेल्या रस्ते प्रकल्पांवरील टोलनाके बंद करणे, नवे पथकर धोरण जाहीर करणे, एसटी व बेस्टला टोलमधून वगळणे, कराराचा कालावधी संपलेले टोलनाके पाडून टाकणे, वाढत्या वाहानांच्या संख्येनुसार टोलचा दर कमी करणे, केंद्राच्या टोल धोरणानुसार टोलनाक्यांवर स्वच्छतागृहे, रुग्णवाहिका, क्रेन तसेच सव्‍‌र्हिस रोडच्या सुविधा निर्माण करणे, प्रकल्पाचे काम शंभर टक्के पूर्ण झाल्याशिवाय टोल आकारणी सुरु न करणे, कमी अंतरावरील टोल नाक्यांच्या वसुलीचा पश्न, टोल नाक्यांचे अंतर आदी मुद्दय़ांवर निर्णय घेण्याची मागणी करणारे निवेदनही राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना दिले.  
रस्ते तयार झाल्यानंतर पुन्हा पुन्हा त्याच रस्त्यांवर केल्या जाणाऱ्या खर्चाचा आढावा घेण्याचे व टोलसाठी लेखापरीक्षक नेमण्याचे मुख्यमंत्र्यांनी मान्य केल्याचे राज यांनी सांगितले. एखाद्या टोलनाक्यावर चोवीस तासांत पुन्हा परत यायचे असेल तर गाडी चालकाकडून दुप्पट टोल न घेता केवळ दीडपट टोल घेतला पाहिजे, गाडय़ा जशा वाढतील तसे टोलचा कालावधी कमी होणे तसेच आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून टोलनाक्यांवरील गाडय़ांची नेमकी मोजदाद केली गेली पाहिजे, ही आमची मागणी असून लवकरच ठेकेदारांच्या चोरीला आळा घालण्यासाठी तांत्रिकदृष्टय़ा करायच्या उपाययोजनांसदर्भात मुख्यमंत्र्यांना भेटून आणखी एक निवेदन दिले जाईल, असेही त्यांनी सांगितले. सेना-भाजपन केलेल्या टीकेचा समाचार घेताना राज म्हणाले, टोलविरोधातील पहिले आंदोलन मनसेने केल्यानंतर राज्यातील ६५ टोलनाके बंद करण्यात आले. आता दहा कोटींच्या आतील कामांसाठीचे २६ टोलनाके बंद होतील. कोल्हापूरमधील आंदोलन शिवसेनेचे नसून ते जनतेचे आहे. भाजपचे विनोद तावडे व अण्णा हजारे यांनी टोलविरोधी आवाज उठविल्यानंतर काही झाले नाही आणि मी आंदोलन करताच सरकार निर्णय घेते यातच सारेकाही आले, असाही टोला त्यांनी लगावला.