मुंबई : धारावी पुनर्विकास प्रकल्पाअंतर्गत अपात्र रहिवाशांच्या पुनर्वसनासाठी कुर्ल्यातील मदर डेअरची २१ एकर जागा देण्यात आली आहे. ही जागा धारावीसाठी देण्यास कुर्लावासियांचा प्रचंड विरोध आहे. मात्र विरोध डावलून सरकारने जागा दिल्याने कुर्ल्यातील रहिवाशी संतप्त झाले आहेत. त्यामुळेच आता त्यांनी रस्त्यावर उतरून राज्य सरकारच्या या निर्णयाचा निषेध करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार रविवार, ८ जून रोजी कुर्ल्यात निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.
राज्य सरकारने धारावीचा कायापालट करण्यासाठी धारावी पुनर्विकास प्रकल्प हाती घेतला आहे. या पुनर्विकासाअंतर्गत पहिल्यांदाच अपात्र झोपडीधारकांचे, वरच्या मजल्यावरील अपात्र रहिवाशांचेही पुनर्वसन करण्यात येणार आहे. त्यांना भाडेतत्वावरील घरांच्या योजनेअंतर्गत समावून घेण्यात येणार आहे. यासाठी धारावी पुनर्विकास प्रकल्पाकडून (डीआरपी) धारावीबाहेरील विविध ठिकाणची १२०० एकर जागा मागण्यात आली आहे. त्यापैकी ५५० एकर जागा देण्यात आली आहे. या जागेत कुर्ला मदर डेअरीच्या २१ एकर जागेचा समावेश आहे. ही जागा धारावीसाठी देण्यात आली असून नुकताच या जागेच्या वापरासंबंधीच्या अटीशर्तींमध्ये बदल करून ही जागा धारावीसाठी वापरण्याचा मार्ग मोकळा करण्यात आला आहे.
कुर्ला मदर डेअरीची जागा धारावीसाठी देण्यास कुर्लावासियांचा प्रचंड विरोध आहे. असे असतानाही ही जागा देण्यात आली आहे. २०२३ पासून कुर्लावासियांनी ही जागा वाचविण्यासाठी जनआंदोलन केले आहे. निषेध मोर्चा, निदर्शने, स्वाक्षरी मोहीम, पोस्टकार्ड मोहीम राबविली. मात्र या विरोधाकडे काणाडोळा करीत ही जागा धारावीसाठी देण्यात आल्याने कुर्लावासियांमध्ये प्रचंड नाराजी आहे. आता कुर्ल्यातील रहिवाशांनी आपले आंदोलन तीव्र करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती कुर्ल्यातील रहिवाशी किरण पैलवान यांनी दिली.
लोक चळवळीने रविवार, ८ जून रोजी निषेध मोर्चाचे आयोजन केले आहे. सकाळी ११.३० वाजता कुर्ल्यातील अभ्युदय बँकेजवळ कुर्लावासिय जमा होणार आहेत. त्यानंतर अभ्युदय बँक ते कुर्ला मदर डेअरी असा मोर्चा निघणार असल्याचेही पैलवान यांनी सांगितले. मदर डेअरीची जागा धारावीसाठी न देता तिथे उद्यान तयार करण्याची कुर्लावासियांची मागणी आहे. या मागणीसाठी आणि ही जागा धारावीसाठी देण्याच्या निर्णयाचा निषेध करण्यासाठी मोठ्या संख्येने कुर्लावासियांनी मोर्चात सहभागी व्हावे, असे आवाहन लोक चळवळीकडून करण्यात आले आहे. कुर्लातील सर्वसामान्य नागरिकांसह सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांना, पदाधिकाऱ्यांना या मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन लोक चळवळीने केले आहे.