मुंबई : मुंबईची फुप्फुसे असलेले आरेचे जंगल हे भविष्यातही जंगलच राहावे आणि आरेमधील मेट्रो कारशेड रद्द करावी, या मागणीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील निवासस्थानासमोर  प्रदेश काँग्रेस कमिटीच्या पर्यावरण विभागातर्फे उद्या, रविवारी  शांततेत निषेध धरणे आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या पर्यावरण विभागाचे अध्यक्ष समीर  वर्तक यांनी दिली.

मुंबई शहराच्या मध्यभागी मुंबईकरांना प्राणवायूचा पुरवठा करणारे पर्यावरणाचे महत्त्व जपणारे, जैवविविधतेने नटलेले आरेचे जंगल आहे. ऑक्टोबर २०१९ मध्ये मुंबई मेट्रोच्या कारशेडसाठी आरे जंगलाची निवड करण्यात आली. दिनांक ४ ऑक्टोबर २०१९ रोजी पर्यावरणप्रेमींच्या आंदोलनानंतरही रात्रीच्या अंधारात हज़ारो वृक्षांची अमानुषपणे कत्तल करण्यात आली. वृक्ष वाचविण्यासाठी आंदोलन करणाऱ्यांना तुरुंगात डांबण्यात आले. या आंदोलनाची दखल आंतरराष्ट्रीय स्तरावरही घेण्यात आली होती. त्यावेळी एकनाथ शिंदे हे महाविकास आघाडी सरकारमध्ये नगरविकासमंत्री होते, तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कारशेडची जागा बदलून आरे हे जंगल म्हणून घोषित केले होते. पण एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होताच त्यांनी आरे जंगलातील मेट्रोच्या कारशेडची जागा बदलली जाणार नाही ही घोषणा केली. पर्यावरण व हवामान ढासळत असताना अशा  निर्णयाच्या विरोधात आणि आरेचे जंगल वाचावे म्हणून आंदोलन करून निषेध व्यक्त केला जाणार आहे.