एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलिनीकरण व्हावे या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांचा सुरू असलेला संप आज १४ व्या दिवशीही सुरूच आहे. पण आता तो अधिक चिघळला असल्याचं चित्र दिसत आहे. राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्या शासकीय निवासस्थानावर आज काळी शाई फेकण्यात आली. या प्रकरणी जनशक्ती संघटनेच्या चार ते पाच कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आलं आहे.

गेल्या काही दिवसांपासून एसटी कामगारांचा संप सुरूच आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेचे मात्र हाल होत आहेत. एसटी महामंडळाचं विलिनीकरण राज्यशासनामध्ये करण्यात यावं अशी एसटी कर्मचाऱ्यांची मागणी आहे. मात्र, सरकार ही मागणी मान्य करायला तयार नाही. विलिनीकरणाच्या निर्णयाचा अभ्यास करण्यासाठी एक समितीही नेमण्यात आली आहे. मात्र तरी आंदोलनकर्ते कर्मचारी संपावर ठाम आहेत. अनेक कर्मचाऱ्यांचं निलंबनही करण्यात आलं आहे, मात्र तरीही एसटी कर्मचारी मागे हटायला तयार नाहीत.

अनिल परब यांनी या संपाच्या मुद्द्यावर सोमवारी शरद पवार यांच्याशी चर्चा केली. या बैठकीला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हेही उपस्थित होते. त्यामुळे या संपावर तोडगा निघण्याची आशा निर्माण झाली होती. मात्र या बैठकीसंदर्भात अद्याप कोणती माहिती समोर आलेली नाही