मुंबईत ठिकठिकाणी नागरिकांनी उत्स्फुर्तपणे रस्त्यावर उतरून दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला. तर काही ठिकाणी उत्स्फूर्तपणे बंद पाळण्यात आला. शैक्षणिक संस्थांमध्येही विद्यार्थ्यांनी शहिदांना श्रद्धांजली वाहिली. नालासोपाऱ्यापाठोपाठ मानखुर्द रेल्वे स्थानकातही नागरिकांनी आंदोलन करण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे तेथील परिस्थिती नियंत्रणात आली.

मुंबईमध्ये ठिकठिकाणी मोर्चे काढून नागरिकांनी दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला. पूर्व उपनगरातील विक्रोळी पार्कसाईट, घाटकोपर कामराज नगर तसेच चेंबूरच्या सिंधी कॅम्प, चेंबूर नाका, टिळक नगर, ट्रॉम्बे चित्ता कॅम्प, मानखुर्द, चुनाभट्टी, भांडुप आणि मुलुंड येथील व्यापाऱ्यांनी शनिवारी सकाळपासूनच दुकाने बंद ठेवली होती. काही ठिकाणी नागरिकांनी मोर्चा काढून पाकिस्तान विरोधात घोषणा दिल्या, तर अनेक ठिकाणी शहीद जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

मुंबईच्या पश्चिम आणि मध्य मुंबईतही अनेक ठिकाणी बंद पाळण्यात आला. मुंबईतील अनेक भागांमध्ये दुकाने बंद ठेवण्यात आली होती, तर काही ठिकाणी अर्धा दिवस दुकाने बंद ठेवून निषेध व्यक्त केला.

शाळा-महाविद्यालयांमध्ये श्रद्धांजली

शहरातील अनेक शाळांमध्ये शहिदांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. शीव येथील एसआयईएस महाविद्यालय, काळाचौकी येथील अहिल्या विद्या मंदिर, अंधेरी येथील चिल्ड्रन वेल्फेअर सेंटर हायस्कूल आणि क्लाराज महाविद्यालयातही विद्यार्थ्यांनी शहिदांना श्रद्धांजली वाहिली.

शहिदांच्या कुटुंबासाठी मदत

शहिदांच्या कुटुंबीयांसाठी देशभरातून मदतीचा ओघ सुरू झाला आहे. ग्रॅन्ट रोड येथील भाजी बाजारातील व्यापाऱ्यांनी शहिदांच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साडेसतरा लाख रुपये जमा केले. जवानांच्या मदतीसाठी पेटीएमच्या माध्यमातून आर्थिक मदत करण्याचे आवाहनही करण्यात येत होते.

समाजमाध्यमांवर तीव्र प्रतिक्रिया

समाजमाध्यमांवरही तीव्र प्रतिक्रिया व्यक्त झाल्या. ट्विटरवर आणि फेसबुकवरून हल्ल्याचा  निषेध करण्यात आला. समाजमाध्यमांवर निषेध व्यक्त करण्यासाठी काळ्या फितीचे डीपी ठेवण्यात आले आहेत. तसेच अनेक  ग्रुपवर दिवसभर मेसेज न करता मौन धारण करून श्रद्धांजली वाहण्यात आली. ग्राफिक्सच्या माध्यमातूनही श्रद्धांजली आणि निषेध व्यक्त करण्यात येत आहेत.

रेल रोको;  लांबपल्ल्याच्या १४ गाडय़ा रद्द

  • पश्चिम रेल्वेवरील नालासोपारा स्थानकात आंदोलन केले. परिणामी, लोकलच्या ५४ फेऱ्या रद्द कराव्या लागल्या, तर लांब पल्ल्याच्या १४ गाडय़ांचा खोळंबा झाला.
  • या आंदोलनामुळे शनिवारी सकाळी ८ वाजल्यापासून पश्चिम रेल्वे मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली. लोकल गाडय़ांबरोबरच लांब पल्ल्याच्या गाडय़ांचाही खोळंबा झाला. या आंदोलनामुळे उपनगरी लोकलच्या ५४ फेऱ्या रद्द कराव्या लागल्या, तर लांब पल्ल्याच्या १४ गाडय़ांचा खोळंबा झाला.
  • या आंदोलनामुळे पश्चिम रेल्वेवरील वाहतूक विस्कळीत झाली. कर्णावती एक्स्प्रेस, सूर्यनगरी एक्स्प्रेस या लांब पल्ल्याच्या गाडय़ा मध्येच थांबविण्यात आल्या. तर मुंबई-सुरत पॅसेंजर, अजमेर-दादर एक्स्प्रेस, भूज -दादर एक्स्प्रेस आदी गाडय़ा रद्द करण्यात आल्या.

बंद, निदर्शने आणि श्रद्धांजली

नालासोपारा रेल्वे स्थानकातील आंदोलनाचे तीव्र पडसाद शहरात उमटले. वसई, विरार, नालासोपारा शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. स्थानक परिसरातील बाजारपेठा, रिक्षा वाहतूक बंद ठेवण्यात आली होती. परिवहन सेवेच्या बसेसही बंद करण्यात आल्या होत्या. विरार आणि नालासोपारा शहरातही तीव्र आंदोलन करण्यात आले. स्थानकात मेणबत्ती पेटवून शहिदांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. शहरातील प्रमुख नाक्यावर टायर जाळून वाहतूक अडविण्यात आली आणि पाकिस्तानचे पुतळे जाळण्यात आले. व्यापाऱ्यांनी दुकाने बंद करून विवा महाविद्यालय नाक्यापर्यंत मोर्चा काढून निषेध व्यक्त केला. विरार पश्चिमेला दुचाकीवरून निषेध रॅली काढण्यात आली.