मुंबई : कोयना धरण पायथा विद्युतगृह (डावा तीर) या जलविद्युत प्रकल्पासाठी ८६२ कोटी २९ लाख रुपयांची तरतूद करण्यास मंगळवारी मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. या प्रकल्पामुळे टेंभू, कृष्णा कोयना उपसा सिंचन योजना (ताकारी-म्हैसाळ) या योजनांसाठी २० टीएमसी पाणी विद्युतनिर्मिती करून सोडले जाणार आहे. प्रकल्पाद्रेवा एकूण २७७.८२ दशलक्ष युनिट वीजनिर्मिती होणार आहे.
कोयना धरणाच्या मूळ नियोजनात पूर्वेकडील सिंचनासाठी ३० टीएमसी तर महाराष्ट्र कृष्णा खोरे महामंडळाअंतर्गत समाविष्ट विविध उपसा सिंचन योजनांसाठी अतिरिक्त २० टीएमसी पाणी देताना त्यातून कमाल मागणीच्या कालावधीत अतिरिक्त विद्युत निर्मिती करणे तसेच धरण पायथ्याची वीजगृहे या कालावधीत रुपांतरित करण्यासाठी कोयना धरण पायथा विद्युतगृह (डावा तीर, २x४० मे.वॅट) या योजनेचे नियोजन करण्यात आले आहे.
दरम्यान २०२३ मध्ये शासनाने सार्वजनिक खासगी भागीदारी तत्त्वाद्वारे उदंचन जलविद्युत प्रकल्प, सौर आणि इतर अपारंपरिक संकरित प्रकल्पांच्या विकासाचे धोरण निश्चित केले आहे. त्यानुसार आता हा प्रकल्प महाराष्ट्र कृष्णा खोरे महामंडळ व महानिर्मिती कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने विकसित करण्यासाठी सामंजस्य करार करण्यात आला आहे. या जलविद्युत प्रकल्पाच्या विकासासाठी आवश्यक १३३६ कोटी ८८ लाखांपैकी ८६२ कोटी २९ लाख रुपयांच्या तरतुदीस प्रथम सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. उर्वरित खर्चांची तरतूद सिंचन योजनांवर टाकण्यात येणार आहे.