मुंबई : कबुतरांच्या विष्ठेमुळे नागरिकांना अस्थमा, क्षयरोग यांसारखे आजार होतात. मात्र याची सुरुवात दम लागणे, खोकला आणि ताप या अजाराने होते. हे आजार सर्वसाधारण असल्यामुळे कबुतर कारणीभूत असल्याचे लक्षात येत नाही. या आजारांची तीव्रता वाढून त्याचे रुपांतर गंभीर आजारात होते, अशी माहिती श्वसनविकार तज्ज्ञांनी दिली. मात्र मुंबईतील कबुतरखाने बंद करून चालणार नाहीत, तर नागरिकांमध्ये जनजागृती करावी लागेल, असेही मत श्वसनविकार तज्ज्ञांनी व्यक्त केले.
मुंबईमध्ये नागरिक माेठ्या प्रमाणात कबुतरांना दाणे घालतात. मुंबईमध्ये जवळपास ५१ कबुतरखाने असून, यापैकी अनेक कबुतरखाने १०० वर्ष जुने आहेत. मात्र हे कबुतर खाने असलेल्या परिसरातील नागरिक श्वसनाच्या आजाराने त्रस्त असून, येथील नागरिकांना प्रामुख्याने अस्थमा व क्षयरोग यासारखे गंभीर आजार झाल्याचे निदर्शनास आले आहे. या नागरिकांना कबुतरांच्या विष्ठेमुळे हे आजार झाले आहेत. विष्ठेतून पसरणाऱ्या बुरशीमुळे मनुष्याच्या वायूकोषांना सूज येते. त्यामुळे त्याला श्वसनदाह सुरू होतो. ही सूज कमी होत असताना वायूकोष आक्रसले जातात. त्यामुळे प्राणवायूचा पुरवठा कमी होतो. प्राणवायू कमी झाल्याने रुग्णाला रुग्णालयात दाखल करावे लागते. श्वसनदाह होत असलेली व्यक्ती कबुतरांच्या सानिध्यातून दूर गेल्याल्यावर हा त्रास कमी होतो. मात्र ती व्यक्ती त्याच परिसरात राहिल्यास हा त्रास गंभीर स्वरूप धारण करतो. त्यातूच पुढे अस्थमा व क्षयरोगासारखे आजार होतात. कबुतरांमुळे कुटुंबातील सर्वांनाच त्रास होत नाही. त्यामुळे त्याची दाहकता लक्षात येत नाही. मुंबईतील कबुतरखाने बंद केल्याने त्या परिसरातील नागरिकांना त्याचा लाभ होणार आहे. परंतु सध्या अनेक इमारतींच्या खिडकी बाहेर लावण्यात आलेल्या वातानुकूलित यंत्रांवर कबुतरांची घरटी दृष्टीस पडतात. त्यामुळे यातून मोठ्या प्रमाणात कबुतरांच्या विष्ठेतील बुरशीजन्य घटक वेगाने पसरतात. कबुतरांची संख्याही वेगाने वाढते. त्यामुळे मुंबईत सर्वच ठिकाणी मोठ्या संख्येने कबुतर दिसत आहेत. त्यामुळे कबुतरखाने बंद करण्याबरोबरच नागरिकांमध्ये जनजागृती करणे आवश्यक असल्याचे, मत केईएम रुगणालयातील श्वसनविकार विभागाच्या प्रमुख डाॅ. अमिता आठवले यांनी व्यक्त केले.
कबुतरांमुळे होणाऱ्या श्वसनाच्या आजाराचे वेळेवर निदान झाले आणि तातडीने उपचार केल्यास तो बरा होतो. मात्र अनेक वेळा हा आजार बरा न होता वाढत जातो. दीर्घकाळानंतर हा आजार गंभीर बनतो. कबुतराच्या विष्ठेमुळे होणाऱ्या आजारामध्ये प्राणवायूची पातळी कमी होऊन रुग्णांना दम लागणे, ताप, खोकला यांसारखी लक्षणे जाणवतात. पण ती लगेच लक्षात येत नाहीत. खोकला ४ ते ६ आठवडे राहिल्यास डॉक्टर क्ष किरण काढतात. यामध्ये काही वेगळी लक्षणे दिसल्यास याचे निदान केले जाते. तसेच वाढत्या वयानुसार व्यक्तींना फुफ्फुसाचे आजार होतात. अशावेळी या व्यक्तीचा संपर्क कबुतरांच्या विष्ठेतून बाहेर पडणाऱ्या बुरशीशी आल्यास त्यांना त्याची लागण वेगाने होते. कबुतरांप्रमाणेच अनेक घरांमध्ये ‘लव्ह बर्ड’ असतात. त्यांच्यापासूनही नागरिकांना श्वसनाचे आजार होत असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे नागरिकांनी कबुतर व लव्ह बर्ड यांच्यापासून दूर राहणे आवश्यक आहे. त्यासाठी नागरिकांमध्ये कबुतराची विष्ठा व त्यापासून होणाऱ्या आजाराबाबत जनजागृती करणे आवश्यक आहे, असे नायर रुग्णालयातील श्वसन विकार तज्ज्ञ यांनी सांगितले.
शहरातील कबुतरखाने बंद करण्याचे आदेश सरकारने मुंबई महानगरपालिकेला दिले असले तरी त्यांच्यापासून नागरिकांची पूर्णपणे सुटका होणार नाही. आता एका ठिकाणी असलेली कबुतरे ही भविष्यात इमारती किंवा वातानुकूलित यंत्राच्या वर घरटी करून राहू शकतात. त्यामुळे कबुतरांच्या विष्ठेमुळे होणाऱ्या आजारांचा धोका पसरण्याची शक्यताही तज्ज्ञांकडून वर्तविण्यात येत आहे.