मुंबई : राज्याच्या अर्थसंकल्पात विकासाची पंचसूत्री मांडण्यात आली असून या पंचसूत्रीच्या अंमलबजावणीसाठी कामाला लागा, युद्धपातळीवर जनहिताच्या योजनांची अंमलबजावणी करून सर्वसामान्य माणसाला दिलासा द्या. जिल्ह्यातील पायाभूत सुविधांच्या विकासाची कामे वेगाने पूर्णत्वाला न्या, असा आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी राज्यातील जिल्हाधिकारी, आयुक्त व पोलीस अधिकाऱ्यांना दिला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी राज्यातील सर्व विभागीय आयुक्त, सर्व जिल्हाधिकारी, सर्व महानगरपालिका आयुक्त, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि पोलीस अधीक्षक आदी क्षेत्रीय स्तरावरील अधिकाऱ्यांशी दूरदृश्यप्रणालीच्या माध्यमातून संवाद साधला. यात त्यांनी राज्याच्या प्राधान्यक्रमावरील कामांचा आणि योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा घेतला. मान्सूनपूर्व कामांचा आढावा घेऊन पूर, अतिवृष्टी तसेच दरड कोसळणे अशा आपत्तीच्या प्रसंगाचा सामना करण्यासाठी योग्य ती पूर्वतयारी व उपाययोजना राबविण्याची सूचनाही मुख्यमंत्र्यांनी केली.