scorecardresearch

‘स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान’ ग्रंथाचे आज प्रकाशन

स्वातंत्र्य आंदोलनात महाराष्ट्रातील क्रांतिकारांनी लढा दिला व हौतात्म्य पत्करले अशा हुतात्म्यांचे संक्षिप्त चरित्र या ग्रंथात समाविष्ट  करण्यात  आले आहे.

मुंबई : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत असताना महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून ‘स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान’ या विषयावर सांस्कृतिक कार्य विभागाच्या दर्शनिका विभागाच्या वतीने तयार करण्यात आलेल्या ग्रंथाचे प्रकाशन आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे. 

स्वातंत्र्य आंदोलनात महाराष्ट्रातील क्रांतिकारांनी लढा दिला व हौतात्म्य पत्करले अशा हुतात्म्यांचे संक्षिप्त चरित्र या ग्रंथात समाविष्ट  करण्यात  आले आहे. १८५७ ते १९४७  या काळातील ओघवता इतिसाहास या ग्रंथात आहे. पुरातत्त्व विभागाच्या अंतर्गत संरक्षित हुतात्मा स्मारके, आनुषंगिक शासकीय योजना, राज्यातील हुतात्मा स्मारकांची यादी, स्वातंत्र्यसैनिकांसाठी पुरविल्या जाणाऱ्या शासकीय सेवासुविधाविषयक शासकीय निर्णय, पुराभिलेख विभागाची निवडक कागदपत्रे यांचा या ग्रंथात समावेश आहे. ग्रंथाचे संपादन कार्यकारी संपादक डॉ. दि. प्र. बलसेकर यांनी केले आहे.

ग्रंथाची मुळ संकल्पना ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आहे. सांस्कृतिक कार्य सचिव सौरभ विजय, ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर, डॉ. अरिवद गणाचारी, डॉ. श्रद्धा कुंभोजकर, बाबासाहेब कांबळे, डॉ. दि. प्र. बलसेकर,  डॉ. विजय कुलकर्णी, जॉ. तेजस गर्गे, सुजितकुमार उगले आदींनी ग्रंथाला मूर्त स्वरूप दिले आहे.  सायली पिंपळे, प्र. रा. गवळी, डॉ. वै. ह. भागवत, डॉ. शा. का. मोरे या संशोधन अधिकाऱ्यांनी ग्रंथनिर्मितीत महत्त्वाची भूमिका बजावली आहे. २७४ पृष्ठांच्या या ग्रंथाची किंमत ४५० रुपये आहे. शासकीय मुद्रणालयात विक्रीसाठी हा ग्रंथ उपलब्ध असेल. ग्रंथाचे मुखपृष्ठ आणि रेखाचित्रे नीलेश जाधव यांनी रेखाटले आहे. या ग्रंथाची ई-आवृत्ती पेनड्राइव्ह स्वरूपात प्रकाशित करण्यात येणार असून, ग्रंथाचा हिंदी आणि इंग्रजी अनुवादही प्रकाशित केला जाणार आहे.

महाराष्ट्रातील विचारवंतांचा कार्याचा आढावा घेणारा ग्रंथ प्रकाशित करण्याचा या विभागाचा मानस आहे. याशिवाय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्ताने ७५ वर्षांचा आढावा घेणारे राज्याच्या सर्व जिल्ह्यांचे विशेष पुरवणी गॅझेटिअर ग्रंथ प्रकाशित करण्याचे काम प्रगतिपथावर आहे. या प्रकाशन समारंभाला उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, मुंबईचे पालकमंत्री आस्लम शेख, उपनगरचे पालकमंत्री आदित्य ठाकरे, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव हे उपस्थित राहणार आहेत.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Publication book contribution maharashtra war independence freedom nectar festival celebrate maharashtra day ysh

ताज्या बातम्या