मंगेशकर भांवडांनी लिहिलेल्या पुस्तकाचे २८ सप्टेंबर रोजी प्रकाशन

भारतीय मनात लतादीदींचे स्थान आहे. पण बहीण म्हणून त्यांची माया आपल्याला कशी लाभली, त्याचा मनोरंजक घटनांतून मी वेध घेण्याचा प्रयत्न केला आहे, अशा शब्दांत गायिका मीना मंगेशकर यांनी आपल्या ज्येष्ठ बहिणीवर लिहिलेल्या ‘मोठी तिची सावली’ या पुस्तकाचे वर्णन केले.

‘गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्यावर आतापर्यंत अनेक पुस्तके लिहिली गेली आहेत. मात्र कुटुंबातील एक सदस्य म्हणून बहीण मीना मंगेशकर यांना दिसलेल्या लतादीदी या पुस्तकात वाचकांना अनुभवयाला मिळतात. एका अर्थाने हे पुस्तक लतादीदींचे आत्मचरित्र नसून भावचरित्र आहे,’ अशा शब्दांत लेखक प्रवीण जोशी यांनी या पुस्तकाचे वर्णन केले. जोशी यांनी या पुस्तकाचे शब्दांकन केले आहे. २८ सप्टेंबरला या पुस्तकाचे प्रकाशन करून लतादीदींना अनोखी भेट दिली जाणार आहे, असे मीना मंगेशकर यांनी सांगितले. ‘मोठी तिची सावली’ या पुस्तकाच्या प्रकाशनाविषयी माहिती देताना त्या बोलत होत्या. ‘लतादीदींच्या स्वभावाला खूप पैलू आहेत. पण मला तिचा विनोदी स्वभाव भावतो,’ असेही त्यांनी आवर्जून नमूद केले. संगीत दिग्दर्शक पं. हृदयनाथ मंगेशकर, उषा मंगेशकर, मीना मंगेशकर-खडीकर, पुस्तकाचे प्रकाशक अप्पा परचुरे यांच्या उपस्थितीत ‘प्रभुकुंज’ येथील निवासस्थानी पत्रकार परिषद घेण्यात आली.

लतादीदी लवकरच ९०व्या वर्षांत पदार्पण करणार आहेत. त्याचे औचित्य साधून रवींद्र नाटय़ मंदिर येथे पुस्तक प्रकाशित करण्यात येणार आहे. यावेळी ‘आनंदघन’ या लतादीदींनी स्वरबद्ध केलेल्या लोकप्रिय गीतांचा कार्यक्रम सादर करण्यात येणार आहे.याचे निवेदन हृदयनाथ मंगेशकर करणार आहेत. मीनाताई आणि भावंडांनी मिळून हे पुस्तक लिहिले असून प्रवीण जोशी यांनी शब्दांकन केले आहे.

मान्यवरांची उपस्थिती

लतादीदी लवकरच ९०व्या वर्षांत पदार्पण करणार आहेत. त्याचे औचित्य साधून रवींद्र नाटय़ मंदिर येथे पुस्तक प्रकाशित करण्यात येणार आहे. यावेळी ‘आनंदघन’ या लतादीदींनी स्वरबद्ध केलेल्या लोकप्रिय गीतांचा कार्यक्रम सादर करण्यात येणार आहे. याचे निवेदन हृदयनाथ मंगेशकर करणार आहेत. मीनाताई आणि भावंडांनी मिळून हे पुस्तक लिहिले असून प्रवीण जोशी यांनी शब्दांकन केले आहे. या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा २८ सप्टेंबरला लोकसभेच्या अध्यक्ष सुमित्रा महाजन यांच्या हस्ते होणार आहे. या सोहळ्याला सांस्कृतिक आणि शिक्षण मंत्री विनोद तावडे, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, पं. शंकर अभ्यंकर यांची प्रमुख उपस्थिती राहाणार आहे.