मुंबई : पायातील रक्ताच्या गाठी (ब्लड क्लॉट) फुफ्फुसांपर्यंत पोहोचल्यास अचानक छातीत तीव्र वेदना होऊन जीवाला धोका निर्माण होऊ शकतो, असा इशारा वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला आहे. ‘पल्मनरी एम्बोलिझम’ (पीइ) नावाने ओळखली जाणारी ही स्थिती अनेकदा लक्षणांशिवाय विकसित होत असल्याने ती अधिक धोकादायक ठरते.

तज्ज्ञांच्या माहितीनुसार, पायातील खोल शिरांमध्ये तयार होणाऱ्या रक्ताच्या गाठींना ‘डीप व्हेन थ्रोम्बोसिस’ (डीव्हीटी) म्हणतात. या गाठी शरीरात फिरत फुफ्फुसांपर्यंत पोहोचल्यास रक्तप्रवाह अडतो आणि रुग्णाला अचानक श्वास घेण्यास त्रास, छातीत वेदना किंवा खोकल्यातून रक्त येणे यांसारखी गंभीर लक्षणे दिसू शकतात. डॉक्टरांच्या मते, अनेक रुग्णांमध्ये सुरुवातीला कोणतीही स्पष्ट लक्षणे दिसत नाहीत. मात्र, थोडे चालले तरी श्वास लागणे, चेहरा किंवा पाय सुजणे, छातीत दुखणे ही लक्षणे दिसल्यास तातडीने तपासणी करणे आवश्यक आहे.

दीर्घकाळ बेडरेस्टवर असलेले रुग्ण, मोठ्या शस्त्रक्रियेनंतरचे रुग्ण, कॅन्सरग्रस्त, गर्भधारणेनंतरच्या महिला, तसेच दीर्घकाळ बसून काम करणारे किंवा लांब प्रवास करणारे लोक या आजाराच्या जास्त जोखमीमध्ये येतात. विशेषतः सहा तासांपेक्षा अधिक वेळ एकाच स्थितीत बसून राहिल्यास रक्तगाठी होण्याचा धोका वाढतो.शहरी जीवनशैली, कमी शारीरिक हालचाल आणि ताणतणाव यामुळे भारतातही या आजाराचे प्रमाण वाढताना दिसत आहे. तज्ज्ञांच्या मते, अनेक प्रकरणांमध्ये वेळेत निदान न झाल्याने रुग्ण गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल होतात.

या आजाराचे निदान डि-डिमीर चाचणी, डॉप्लर स्कॅन आणि सीटी पल्मनरी अँजिओग्राफीद्वारे केले जाते. उपचारामध्ये रक्त पातळ करणारी औषधे दिली जातात. गंभीर परिस्थितीत क्लॉट विरघळवण्यासाठी विशेष उपचार किंवा शस्त्रक्रिया करावी लागू शकते. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार नियमित हालचाल ठेवणे, प्रवासादरम्यान पाय हलवत राहणे, भरपूर पाणी पिणे आणि गरज असल्यास कॉम्प्रेशन स्टॉकिंग्सचा वापर करणे यामुळे हा धोका टाळता येतो. शस्त्रक्रियेनंतर लवकर हालचाल सुरू करणेही महत्त्वाचे आहे. याशिवाय आयटी, एआय तसेच बैठे काम करणाऱ्यांसाठी पल्मनरी एम्बोलिझम हा ‘सायलेंट किलर’ ठरू शकतो, त्यामुळे याबाबत जनजागृती करणे अत्यंत आवश्यक असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले. एकीकडे कामाची वेळ, सहासाह तास एकाच जागी बसून काम करणे आणि धुम्रपान व मद्यपानाच्या सवयी याचाही फटका बसू शकतो असा इशारा डॉक्टर देताना दिसतात. सामान्यपणे दर तासाने बैठे काम करमाऱ्यांनी थोडी हालचाल करणे आवश्यक असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. वेळेत निदान आणि उपचार केल्यास रुग्णाचे प्राण वाचू शकतात, असेही त्यांनी स्पष्ट केले.