मुंबई : पुण्यात रंगणाऱ्या ऐतिहासिक १०० व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी राज्य सरकारने तब्बल पाच कोटी रुपयांचे अर्थसहाय्य मंजूर केले आहे. संमेलनाला दोन कोटींचे अनुदान दिले जात असे. ते आता थेट पाच कोटी करण्याचा निर्णय मराठी भाषा विभागाने घेतला असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्ली संमेलनात दिलेला शब्द अखेर पूर्ण केला आहे.

अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळामार्फत आयोजित करण्यात येणाऱ्या साहित्य संमेलनासाठी २०१८ मध्ये ५० लाख रुपये अर्थसहाय्य देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर २०२३-२४ पासून साहित्य आणि संस्कृती मंडळामार्फत दरवर्षी दोन कोटी रुपयांचे अर्थसहाय्य देण्यास मान्यता देण्यात आली. मात्र, शंभरावे संमेलन भव्य स्वरूपात आयोजित करता यावे यासाठी यंदा पाच कोटी रुपये देण्यात येणार आहेत.

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडून हे अर्थसहाय्य अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाला देण्यात येईल. मात्र, निधी वितरित करण्यापूर्वी महामंडळाने संमेलनासाठी अर्थसहाय्याचा प्रस्ताव मंडळाकडे सादर करणे बंधनकारक असेल.

निधीची रक्कम दसऱ्यापूर्वी महामंडळाच्या खात्यात एकरकमी जमा केली जाईल. या निधीचा वापर केवळ साहित्य संमेलनातील मराठी भाषा आणि साहित्यविषयक विविध उपक्रमांसाठीच करावा लागणार आहे. संमेलनानंतर निधीच्या खर्चाचे प्रमाणपत्र, संमेलनाचा वृत्तांत आणि सनदी लेखापालांकडून तपासलेले लेख्यांचे विवरणपत्र सादर करणे बंधनकारक असेल.