मुंबई : मराठवाड्याच्या रेल्वे संपर्काला नवे बळ देणाऱ्या बीड-पुणे उद्घाटन विशेष रेल्वेला गुरुवारी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवण्यात आला. अहिल्यानगर-बीड नव्या रेल्वेमार्गाचे काम पूर्ण झाल्यानंतर सुरू झालेली ही सेवा पुढे गाडी क्रमांक ११४३३/११४३४ पुणे-बीड-पुणे दैनिक एक्स्प्रेस म्हणून नियमित धावणार आहे. त्यामुळे बीड पुण्याशी थेट दैनंदिन रेल्वेने जोडले जाणार असून, बीडहून मुंबईकडे येणाऱ्या प्रवाशांसाठीही पुणे मार्ग हा अधिक सोयीचा ठरणार आहे.
मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्रातील शिक्षण, रोजगार, उद्योग, वैद्यकीय सेवा व व्यापारासाठी होणाऱ्या प्रवासाला या रेल्वेचा मोठा हातभार लागणार आहे. बीडला प्रथमच पुण्याशी थेट दैनंदिन रेल्वे जोडणी मिळाल्याने विद्यार्थी, नोकरी-व्यवसायासाठी प्रवास करणारे, व्यापारी, भाविक व रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे. बीड जिल्ह्यातील प्रवाशांना आतापर्यंत प्रामुख्याने एसटी वा खासगी बसवर अवलंबून राहावे लागत होते. सध्या पुणे-बीड दरम्यानचा रस्ता प्रवास सुमारे २४५ किमी असून त्यासाठी साधारण सात तास लागतात.
पुणे-बीड एसटी बसचे भाडे बसच्या प्रकारानुसार सुमारे ४५० रुपयांपासून सुरुवात आहे. तर, खासगी बसचे भाडे ६०० ते १,२०० रुपये दरम्यान आहे. त्यामुळे रेल्वे प्रवास हा खर्चाच्या दृष्टीने अधिक परवडणारा पर्याय ठरणार आहे. पुणे-बीडदरम्यान रेल्वेमार्गाचे अंतर सुमारे ३२० किमी आहे. या मार्गावरील रेल्वेचे सामान्य श्रेणीचे भाडे सुमारे १४० रुपये, द्वितीय आसनासाठी १५० ते २०० रुपये, शयनयानासाठी सुमारे २३० रुपये, तर वातानुकूलित तृतीय (वातानुकूलित) श्रेणीचे भाडे ६०० ते ८०० रुपये असण्याची अपेक्षा आहे.
चार मोठे फायदे
– विद्यार्थी व नोकरी करणाऱ्यांना दिलासा-शिक्षण, उद्योग व वैद्यकीय सेवांसाठी होणारा प्रवास अधिक सुलभ
व्यापार व पर्यटनाला चालना
– कृषी उत्पादनांची वाहतूक सुलभ होण्याबरोबरच परळी वैजनाथ, अंबाजोगाई व कंकालेश्वर यांसारख्या धार्मिक पर्यटनालाही बळ
मुंबईकडे पर्यायी मार्ग
– पुणे जंक्शनमार्गे मुंबईसह देशातील इतर शहरांशी रेल्वे संपर्क अधिक सुलभ
गाडी क्रमांक ०१४०१ उद्घाटन
विशेष गाडी अमळनेर भांड्याचे, नवी आष्टी, नारायणडोह, अहिल्यानगर, श्रीगोंदा रोड, दौंड कॉर्ड लाइन व उरुळी या स्थानकांवर थांबा आहे. या गाडीत दोन वातानुकूलित द्वितीय, तीन वातानुकूलित तृतीय, चार शयनयान, चार सामान्य द्वितीय, एक गार्ड्स ब्रेक व्हॅन व एक जनरेटर व्हॅन असे एकूण १५ डबे आहेत. अहिल्यानगर-बीड-परळी वैजनाथ नव्या रेल्वेमार्ग प्रकल्पातील अहिल्यानगर-बीड विभाग सुरू झाल्यानंतर ही सेवा प्रत्यक्षात आली आहे.
