मुंबई : विधान परिषदेच्या पुणे पदवीधर मतदारसंघात सध्या राष्ट्रवादीचा आमदार असतानाही या जागेवर महायुतीत पक्षाच्या वतीने दावा करण्यात आला नाही याबद्दल पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटले व प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी नेतृत्व म्हणजे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार व खासदार पार्थ पवार यांच्याविषयी तीव्र नापसंती व्यक्त केली आहे. पक्षाच्या भूमिकेमुळे कार्यकर्ते हताश झाल्याची टीका पटेल यांनी केली. पुणे शिक्षकची जागा सोडण्यास भाजपने नकार देताच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उमेदवार उभा करून भाजपला आव्हान दिले, पण राष्ट्रवादीने या निवडणुकीत सपशेल माघार घेतली आहे.
विधान परिषदेच्या पाच जागांसाठी सध्या निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. मुदत संपणाऱ्या पाचपैकी दोन जागा या राष्ट्रवादीकडे होत्या. यापैकी छत्रपती संभाजीनगरची जागा महायुतीत राष्ट्रवादीच्या वाटयाला आली. पण पुणे पदवीधर मतदारसंघाच्या जागेसाठी राष्ट्रवादी अजित पवार गटाने दावाच केला नाही. जागावाटप निश्चित करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन उपमुख्यमंत्र्यांबरोबर चर्चा केली. या चर्चेपूर्वी राष्ट्रवादीच्या काही नेत्यांनी सुनेत्रा पवार यांना पुण्याच्या जागेवर दावा करण्याचा सल्ला दिला होता. पण पुण्याची जागा सुनेत्रा पवार यांनी प्रतिष्ठेची केली नाही. या मतदारसंघात आता भाजपचा उमेदवार रिंगणात आहे. पुण्याची हक्काची जागा राष्ट्रवादीला गमवावी लागली.
दुसरीकडे, पुणे शिक्षक मतदारसंघाची जागा शिवसेना शिंदे गटाला सोडण्यास भाजपने नकार दिला. शिंदे यांनी आपल्या पक्षाचे उमेदवार मंगेश चिवटे यांना अधिकृत उमेदवारी देत भाजपला आव्हान दिले. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत शुक्रवारपर्यंत आहे. तोपर्यंत काही तोडगा न निघाल्यास मैत्रीपूर्ण लढतीची तयारी शिंदे यांनी केली आहे. शिंदे हे भाजपला आव्हान देत असतानाच राष्ट्रवादीने सरळ सरळ माघार घेतल्याबद्दल पक्षातच संतप्त भावना आहे.
पुणे पदवीधर मतदारसंघाची जागा राष्ट्रवादीला महायुतीत न मिळणे हे आमचे सामुहिक अपयश असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) खासदार सुनील तटकरे यांनी व्यक्त केली. तर पुण्याच्या जागेवरील दावा सोडल्याने पुणे व आसपसच्या जिल्ह्यातील कार्यकर्ते हताश झाल्याची टीका पक्षाचे ज्येष्ठ नेते खासदार प्रफुल्ल पटेल यांनी केली. पटेल आणि तटकरे या दोघांचेही पार्थ पवार यांच्याशी फारसे जमत नाही.
पार्थ पवार यांच्या पुढाकाराने निवडणूक आयोगाला सादर करण्यात आलेल्या पत्रात राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांच्या यादीतून पटेल व तटकरे यांना वगळण्यात आले होते. ही ‘प्रशासकीय चूक’ लगेचच दुरुस्त केली जाईल, असे तेव्हा उपमुख्यमंत्री तथा पक्षाध्यक्षा सुनेत्रा पवार यांनी जाहीर केले होते. त्यालाही चार महिने उलटले तरी ही प्रशासकीय चूक दुरुस्त करण्यात आलेली नाही. पक्षाच्या कारभारात सुधारणा व्हावी, असा सल्ला पटेल यांनी मागे सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांना दिला होता. पुण्याच्या जागेवरून पटेल आणि तटकरे यांनी नेतृत्वालाच चिमटा काढल्याने राष्ट्रवादीतील अंतर्गत मतभेद अद्यापही कायम असल्याचेच स्पष्ट होते.
