मुंबई: मागील आठवडयात पुणे शहरामध्ये घडलेल्या विषारी दारु दुर्घटनेच्या पार्श्वभुमीवर राज्य उत्पादन शुल्क आयुक्त राजेश देशमुख यांच्या आदेशानुसार आणि कोकण विभागीय उपआयुक्त प्रदीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य उत्पादन शुल्क विभागाने ठाणे, पालघर व रायगड जिल्हयात अवैध हातभट्टी निर्मिती व विक्री केंद्राविरुध्द राबविलेल्या विशेष मोहिमेत तब्बल दीड कोटी रुपयांची गावढी दारु नष्ट करण्यात आली असून २१३ लोकांना अटक करण्यात आली आहे.
उत्पादन शुल्क विभागाने राज्यभर अवैध हातभट्टी निर्मिती व विक्री केंद्राविरुध्द विशेष मोहिम सुरू केली आहे. कोकण विभागातील ठाणे, पालघर, रायगड या तीनही जिल्हयात एकूण ३१३ गुन्हे नोंद करुन २१३ आरोपींना अटक करण्यात आली आहे. सदर कारवायांमध्ये एकूण एक कोटी ५८ लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त व नाश करण्यात आला आहे. यामध्ये ठाणे जिल्हयातील हातभट्टी निर्मितीची हॉटस्पॉट असलेले दिवा गावखाडी, घेसर, अंजूर, अलीमघर, छोटी देसाई, मोठी देसाई, आगासन , घेसर, खर्डी, सरळांबे, वाशाळा, घोरपे, पालेगांव, सावरणे, वेळू, कोरावले, वसारगाव, हाजीमलंग, कुशिवली, माणेरागाव, द्वारलीपाडा, कुंभार्ली , केवणी, कालवार, वडुनवघर, मामेखर्डी, कारीवली, मामणोली, जांभुळगाव, नांदपगाव, केशव श्रष्टी, उत्तन, मुरदागाव, कोपराखाडी, गोराई खाडी याठिकाणी गुन्हे नोंद करुन सदर हातभट्टी निर्मिती केंद्र नष्ट करण्याची कारवाई केली. तसेच पालघर जिल्हातील हातभट्टी निर्मितीची हॉटस्पॉट असलेले मालजीपाडा, वसई, विरार, पालघर याठिकाणी गुन्हे नोंद करुन सदर हातभट्टी निर्मिती केंद्र नष्ट करण्याची कारवाई केली. तसेच रायगड जिल्हातील हातभट्टी निर्मितीची हॉटस्पॉट असलेले रावेगाव, बेकरेगाव , जावळीगाव याठिकाणी गुन्हे नोंद करुन सदर हातभट्टी निर्मिती केंद्र नष्ट करण्याची कारवाई केली. तसेच अवैध मद्य वाहतूकी विरुध्द गुन्हे नोंद करुन एकूण आठ वाहने जप्त करण्यात आलेली आहेत.
पुणे येथे झालेल्या घटनेच्या अनुषंगाने अनुउचित प्रकार घडु नये त्याकरीता ठाणे विभागातील दारुचे साठे व निर्मिती केंद्र, विक्री करणारे यांना राज्य उत्पादन शुल्क विभागाने हिटलिस्टवर ठेवले आहे. सदर कारवाईमध्ये स्वत: विभागीय उप आयुक्त, कोकण विभाग प्रदिप पवार, यांनी सहभाग घेवून हाभट्टीच्या ठिकाणी खाडीमधुन बोटीने प्रवास करुन गोपनीय धाडसत्र हाती घेतले आहे. या धाडसत्रामध्ये अधीक्षक उत्तम शिंदे, उपअधीक्षक अभिजीत देशमुख, निरीक्षक संजय ढेरे, दिपक परब, दुय्यम निरीक्षक अंकुश औताडे यांनी सहभाग घेतला होता.
आपल्या परिसरात कोठेही बनावट मद्य, परराज्यातील मद्य, अवैध मद्य निर्मिती किंवा विक्री होत असेल अथवा मिथेनॉल, क्लोरेल हायड्रेट यासारख्या पदार्थाची किंवा द्रव्याची निर्मिती, भेसळ, वाहतूक किंवा विक्री होत असल्यास 18002339999 या टोल-फ्री क्रमांकावर माहिती द्यावी. तसेच 8422001133 या व्हॉट्सऍ़प क्रमांकावरही माहिती पाठवता येईल. माहिती देणाऱ्यांचे नाव गोपनीय ठेवले जाईल असे आवाहन पवार यांनी केले आहे.
