मुंबई : पुणे शहरामध्ये नुकत्याच घडलेल्या विषारी दारु दुर्घटनेत २४ बळी गेल्याच्या पार्श्वभूमीवर हातभट्टी निर्मिती व विक्री केंद्राविरुद्ध उत्पादन शुल्क आयुक्त डॉ. राजेश देशमुख यांनी धडक मोहीम हाती घेतली आहे. त्यामध्ये ठाणे, पालघर व रायगड जिल्ह्यात ३१३ गुन्हे नोंद करुन २१३ आरोपींना अटक करण्यात आली असून एक कोटी ५८ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

ठाणे जिल्ह्यातील हातभट्टी निर्मितीचे केंद्र असलेले दिवा गावखाडी, घेसर, अंजूर, अलीमघर, छोटी देसाई, मोठी देसाई, आगासन, खर्डी, सरळांबे, वाशाळा, घोरपे, पालेगांव, सावरणे, वेळू, कोरावले, वसारगाव, हाजीमलंग, कुशिवली, माणेरागाव, द्वारलीपाडा, कुंभार्ली, केवणी, कालवार, वडुनवघर, मामेखर्डी, कारीवली, मामणोली, जांभुळगाव, नांदपगाव, उत्तन, मुरदागाव, कोपराखाडी, गोराई खाडी याठिकाणी छापे टाकत हातभट्टी निर्मिती केंद्रे नष्ट करण्यात आली.

तसेच पालघर जिल्ह्यातील मालजीपाडा, वसई, विरार व पालघर याठिकाणी गुन्हे नोंद करुन हातभट्टी निर्मिती केंद्रे नष्ट करण्यात आली. रायगड जिल्ह्यातील रावेगाव, बेकरेगाव, जावळीगाव याठिकाणी गुन्हे नोंद करुन हातभट्टी नष्ट करण्यात आल्या आहेत. अवैध मद्य वाहतूकी विरुध्द गुन्हे नोंद करुन एकूण आठ वाहने जप्त करण्यात आली आहेत. राज्य उत्पादन शुल्क आयुक्त डॉ. राजेश देशमुख आणि सहआयुक्त प्रसाद सुर्वे यांनी दिलेल्या निर्देशानुसार विभागीय उपआयुक्त प्रदीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली अधीक्षक उत्तम शिंदे, उपअधीक्षक अभिजीत देशमुख, निरीक्षक संजय ढेरे, दिपक परब, दुय्यम निरीक्षक अंकुश अवताडे व जवान यांनी या कारवायांमध्ये भाग घेतला.

माहितीसाठी नि:शुल्क क्रमांक

बनावट मद्य, परराज्यातील मद्य, अवैध मद्य निर्मिती किंवा विक्री होत असेल अथवा मिथेनॉल, क्लोरेल हायड्रेट यासारख्या पदार्थाची किंवा द्रव्याची निर्मिती, भेसळ, वाहतूक किंवा विक्री होत असल्यास १८००२३३९९९९ या नि:शुल्क क्रमांकावर माहिती द्यावी. ८४२२००११३३ या व्हॉट्सॲप क्रमांकावरही माहिती पाठवता येईल. माहिती देणाऱ्यांचे नाव गोपनीय ठेवले जाईल, असे आवाहन राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

तीन विभागांचे एकमेकांकडे बोट

हातभट्टी हा विषय १९७५ पर्यंत गृह विभागाच्या अंतर्गत होता. नंतर तो उत्पादन शुल्क विभागाकडे आला. मात्र, उत्पादन शुल्क विभागाच्या हातभट्टी नियंत्रणाला मर्यादा आहेत. या विभागाला म्हणावी तशी गृहविभागाची साथ मिळत नाही. पुणे विषारी दारु दुर्घटनेत उत्पादन शुक्ल विभागाने गतीने छापे टाकले, गुन्हे नोंदवले. मात्र गृहविभाग शांत राहिला. हातभट्टीमध्ये मिथेनॉल मिसळल्याने दारुचे बळी जातात. त्या मिथेनॉलवर अन्न व औषध प्रशासन नियंत्रण आहे. पुणे विषारी दारु प्रकरणी उत्पादन शुल्कचे १४ कर्मचारी निलंबीत झाले. तुलनेत अन्न व औषध प्रशासन व गृह विभागांना कमी झळ बसली. उत्पादन शुल्क विभागाच्या मंत्री उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आहेत. विषारी दारु दुर्घटना उपमुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात घडली आहे. त्यामुळे या प्रकरणाचे गांभीर्य वाढले आहे.

कोण आहेत डॉ. राजेश देशमुख ?

उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त डॉ. राजेश देशमुख आहेत. २००९ च्या तुकडीचे आयएएस असलेले डॉ. देशमुख हे अजित पवार यांच्या विश्वासातील अधिकारी होते. डॉ. देशमुख हे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे खाजगी सचिव सुद्धा आहेत. उत्पादन शुल्कच्या मंत्री सुनेत्रा पवार आहेत. त्यामुळे उत्पादन शुल्क विभागाने पुणे विषारी दारु दुर्घटना गांभीर्याने घेतली असून मुंबई महापालिकेशेजारील राज्य मुख्यालयात बैठकांचे सत्र सुरू आहे.