मुंबई :  पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये (फुगेवाडी, दापोडी आणि हडपसर परिसर) गावठी दारू पिल्याने तब्बल १८ जणांचा मृत्यू झाला. अवघ्या ३० रुपयांत मिळणाऱ्या या दारूच्या सेवनामुळे अनेकांची प्रकृती गंभीर आहे. दारूत ‘मिथेनॉल’ हे विषारी रसायन मिसळल्यामुळे हे मृत्यू तांडव घडल्याचे समोर येताच अन्न व औषध प्रशासन विभागाचे (एफडीए) आयुक्त  तुकाराम मुंढे यांनी ‘मिथेनॉल’चा अवैध साठा करणाऱ्यावर कारवाईचे आदेश दिले होते.

भिवंडी परिसरातील  रेक्स इंटरनॅशनल  कंपनीवर धाड टाकून ‘मिथेनॉल’ या  विषारी रसायनाचा मोठा साठा जप्त करण्यात आला.  विशेष म्हणजे, याच कंपनीकडून  पुण्याच्या विक्रेत्याने दारूत ‘मिथेनॉल’ मिसळले होते.

विषारी दारूमुळे प्राण गमावणाऱ्यांनी कर्नाल सिंग विरका यांच्या फुगेवाडी येथील घरी हातभट्टीची दारु  पिली होती.  विरका याने योगेश वानखेडे नावाच्या इसमाकडून दारू मिळवली  होती. योगेश हा उरळी कांचन येथील राजू प्रजापती याच्याकडून दारू आणून इतरांना पुरवठा करत होता. पुण्यातील घटनेत दारूत वापरण्यात आलेले ‘मिथेनॉल’  हे मे. रेक्स इंटरनॅशनल  यांच्याकडून प्राप्त झाल्याचे पोलिस तपासात स्पष्ट झाले आहे.

या कंपनीचे कार्यालय वाशी येथे तर गोदाम   अनंत  अँड  कंपनी, गाळा नंबर ५४४/ए, म्हात्रे कंपाउंड, अंजुर रोड,  वळगाव भिवंडी येथे असल्याचे कळताच  तुकाराम मुंढेंच्या निर्देशानुसार योगेंद्र पोळ, औषध निरीक्षक, ठाणे  यांनी धाड घातली. त्यावेळी संस्थेचे मालक  अरूणकुमार चौबे, सक्षम व्यक्ती अभिषेक अरूणकुमार चौबे हजर नव्हते.  चौकशी केली असता त्यांना राज्य उत्पादन शुल्क  विभागाने ताब्यात घेतल्याचे कळले. या कारवाईत  संस्थेकडे एकूण ५९२९ किलोग्रॅम इतका  साठा आढळून आला. विशेष म्हणजे,  विषारी द्रव्याची  कोणतीही नोंद उपलब्ध नव्हती. साठा नोंदवहीही आढळली नाही.

मिथेनॉलच्या खरेदी विक्रीची नोंद नाही

विषारी द्रव्य कायद्यातील नियमांतर्गत संस्थेकडे सदर द्रव्यांचा कोणताही खरेदी-विक्रीचा तपशील उपलब्ध नव्हता. त्यामुळे अखेर   विषारीद्रव्याचा गैरवापर  होऊ नये म्हणून तो साठा जप्त करण्यात आला. कंपनीचे मालक अरूणकुमार चौबे व सक्षम व्यक्ति श्री. अभिषेक  अरूणकुमार चौबे यांचे विरुद्ध नारपोली पोलिस  ठाणे, भिवंडी येथे  तक्रार दाखल करण्यात आली त्यानुसार पोलिसांनी दोन्ही आरोपीविरुद्ध गुन्हा नोंद केला आहे  व सोबतच अन्न व औषध प्रशासन ठाणे कार्यालयाने  विषारी द्रव्य  अधिनियमान्तर्गत  कारणे दाखवा  नोटिस देऊन परवाना रद्द करण्याची कारवाई सुरू करण्यात आली आहे.

अन्न व औषध प्रशासन विभागाचे  आयुक्त म्हणून श्री तुकाराम मुंढे यांनी वेळीच समयसूचकता दाखवून या कारवाईचे आदेश दिल्याने पुढील अनर्थ टळला. अन्यथा पुण्यासारख्या घटनेची पुनरावृत्ती होण्याची भीती होती. या कारवाईने अवैध दारू विक्रेते व ‘मिथेनॉल’चा साठा करणाऱ्या कंपन्या यांच्यातील संबंधाचे पितळ उघडे पडले असून , राज्यात इतर ठिकाणीही अशा पद्धतीने दारू निर्मिती व विक्री होते का, हे तपासून पाहणे गरजेचे झाले आहे.

सुरक्षित अन्न आणि औषध हा प्रत्येकाचा अधिकार

जनतेच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला किंवा आस्थापनेला प्रशासनाकडून कोणतीही सवलत दिली जाणार नाही. अन्न व औषधांच्या बाबतील बेकायदेशीर कामकाज करणाऱ्या कोणत्याही संस्था वा व्यक्ती  आणि अवैध औषध उत्पादन व विक्रीविरुद्धची कारवाई यापुढे अधिक कठोर आणि सातत्यपूर्ण असेल.  औषधे व सौंदर्ये प्रसाधने कायदा, १९४० व इतर अनुषंगिक कायदे व नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात यापुढे थेट कायदेशीर न्यायालयीन कारवाई करण्यात येईल. सुरक्षित अन्न आणि औषध हा प्रत्येक नागरिकाचा मूलभूत अधिकार आहे आणि तो सुनिश्चित करणे हीच आमची मुख्य जबाबदारी आहे. ती आम्ही तत्परतेने व परिणामकारकरित्या पार पाडू, असा इशारा अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिला आहे.