मुंबई : म्हाडाच्या पुणे मंडळाकडून १५ टक्के एकात्मिक योजना आणि २० टक्के सर्वसमावेशक योजनेतील ४१८६ घरांच्या सोडतीसाठी नोंदणी, अर्जविक्री-स्वीकृती प्रक्रिया सुरु आहे. या सोडतीतील २० टक्के योजनेतील वाकड आणि हिंजवडी येथील प्रकल्पातील ९० लाखांचे घर ३० लाखांत अशा बातम्या समाज माध्यमांवर प्रसारित होत आहेत. या बातम्यांसाठी म्हाडाच्या लोगोचा वापरही करण्यात येत आहे.
या चुकीच्या आणि खोट्या बातम्यांच्या विरोधात आणि म्हाडाच्या लोगोचा वापर केल्याविरोधात अखेर पुणे मंडळाने सायबर पोलिसात अज्ञात व्यक्तिंविरोधात तक्रार दाखल केली आहे. या चुकीच्या बातम्यांना भुलू नये असे आवाहन पुणे मंडळाने इच्छुकांना, अर्जदारांना केले आहे.
पुणे मंडळाला १५ टक्के एकात्मिक योजना आणि २० टक्के सर्वसमावेशक योजनेअंतर्गत उपलब्ध झालेल्या पुण्यातील ४१८६ घरांसाठी ११ सप्टेबरपासून नोंदणी, अर्जविक्री-स्वीकृती प्रक्रिया सुरु झाली आहे. ही प्रक्रिया १ नोव्हेंबरला संपुष्टात येणार होती तर त्यानंतर पुढील प्रक्रिया पार पाडत २१ नोव्हेंबरला सोडत काढली जाणार होती. मात्र या प्रक्रियेस मुदतवाढ दिल्याने आता इच्छुकांना २१ नोव्हेंबरपर्यंत अर्ज भरता येणार असून या घरांसाठी आता ११ डिसेंबरला सोडत काढली जाणार आहे.
अशा सोडतीतील वाकड आणि हिंजवडी येथील २० टक्के योजनेतील घरांबाबत सध्या समाज माध्यमांवरुन खोट्या आणि चुकीच्या बातम्या प्रसारित होत असून यासाठी काही रिल्सस्टार म्हाडाचा लोगोही वापरत आहेत. वाकड आणि हिंजवाडीतील घर ९० लाखांचे असून ते केवळ ३० लाखांत मिळत आहे, तेव्हा हे घर खरेदी करण्याची संधी आहे अशा प्रकारच्या बातम्या समाज माध्यमांवर फिरत आहेत. कोणत्याही रिल्सस्टार्सना ९० लाखाचे घर ३० लाखांत अशा बातम्या देण्याचा वा म्हाडाचा लोगो वापरण्याचा अधिकार नाही, हे बेकायदेशीर कृत्य असून ही म्हाडासह नागरिकांची फसवणूक आहे असे म्हणत पुणे मंडळाने याची गंभीर दखल घेतली आहे.
या प्रकरणी पुणे मंडळाने नुकतीच सायबर पोलिसांकडे तक्रार दाखल केली असून सोमवारी याप्रकरणी गुन्हा दाखल केला जाणार असल्याची माहिती पुणे मंडळातील वरिष्ठ अधिकार्याने लोकसत्ताला दिली. पुणे मंडळाच्या ४१८६ घरांच्या सोडतीसाठीची सोडतपूर्व प्रक्रिया सुरु असून म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊनच इच्छुकांनी अर्ज भरावेत. कोणत्याही चुकीच्या, खोट्या बातम्यांना बळी पडू नये, दलालांच्या भूलथापांना बळी पडू नये असे आवाहन पुणे मंडळातील अधिकार्यांनी केले आहे.
