मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळाच्या (महाआयटी) प्रणालीच्या अद्ययावतीकरण व डेटा सेंटर स्थलांतराच्या कामासाठी राज्य सरकारच्या विविध विभागांची ऑनलाइन सेवा शुक्रवारी दुपारी ४ पासून बंद होणार आहे. मंगळवारी २० ऑक्टोबरला सेवा पूर्ववत होणार आहेत. तेव्हा याचा सर्वाधिक फटका म्हाडाच्या पुणे मंडळाच्या सोडतीला बसणार आहे.
पुण्यातील ४४६२ घरांच्या सोडतीसाठी नोंदणी, अर्जविक्री-स्वीकृती प्रक्रिया सुरू असून या प्रक्रियेला तांत्रिक अडचणींमुळे तीनदा मुदतवाढ देण्यात आली आहे. अशात आता पाच दिवस महाआयटी प्रणाली बंद राहणार असल्याने इच्छुकांना नोंदणी, अर्जविक्री प्रक्रिया पूर्ण करता येणार असली, तरी कागदपत्रांची पडताळणी होणार नसल्याने अनामत रकमेसह अर्ज सादर करता येणार नाहीत. आधीच पुणे मंडळाकडे ११ हजार अर्जदारांच्या कागदपत्रांची पडताळणी शिल्लक असताना आता त्यात आणखी वाढ होणार आहे. त्यामुळे पुणे मंडळाला पुन्हा मुदतवाढ द्यावी लागण्याचीही शक्यता आहे.
पुणे मंडळाला १५ टक्के सामाजिक गृहनिर्माण आणि २० टक्के सर्वसमावेशक योजनेअंतर्गत उपलब्ध झालेल्या ४४६२ घरांसाठी १४ ऑगस्टपासून नोंदणी, अर्जविक्री-स्वीकृती प्रक्रिया सुरू आहे. सोडतपूर्व प्रक्रिया पूर्ण करून आतापर्यंत सोडत पार पडणे अपेक्षित होते. मात्र, तांत्रिक अडचणींमुळेच सोडतपूर्व प्रक्रियेस तीन वेळा मुदतवाढ देण्यात आली. त्यामुळे सोडतही लांबणीवर पडली आहे.
तिसऱ्या मुदतवाढीनुसार २२ ऑक्टोबरपर्यंत नोंदणी, अर्जविक्री-स्वीकृती प्रक्रिया सुरू राहणार असून ४ डिसेंबरला सोडत काढली जाणार आहे. दरम्यान, पंधरा दिवसांपासून अर्ज भरताना अर्जदारांना अनेक तांत्रिक अडचणी येत आहेत. महाआयटीच्या संगणकीय प्रणालीतील बिघाडामुळे कागदपत्रांची पडताळणी संथगतीने सुरू असल्याने अर्जांची पडताळणी रखडली आहे. याच कारणांमुळे तिसऱ्यांदा मुदतवाढ देण्यात आली होती.
पुन्हा मुदतवाढ ?
तिसऱ्या मुदतवाढीत प्राप्त सर्व अर्जांची पडताळणी पूर्ण करून सोडतीतील पात्र अर्जांची यादी प्रसिद्ध करण्याचे नियोजन पुणे मंडळाचे होते. आजघडीला तब्बल ११ हजार अर्जांची पडताळणी शिल्लक असल्याने पुणे मंडळाची चिंता वाढली होती. त्यात आता आणखी भर पडली आहे. कारण शुक्रवारी दुपारी ४ वाजल्यापासून महाआयटी प्रणाली बंद करण्यात आली आहे.
प्रणालीच्या अद्ययावतीकरणासह डेटा सेंटर स्थलांतराच्या कामासाठी २० ऑक्टोबरपर्यंत प्रणाली, पर्यायाने सर्व सरकारी ऑनलाइन सेवा बंद राहणार आहेत. त्यामुळे याचा फटका आता सोडतपूर्व प्रक्रियेलाही बसणार आहे. अर्ज भरताच येणार नसल्याने, अर्जांची पडताळणी शिल्लक असलेल्या अर्जांची संख्या प्रचंड वाढण्याची शक्यता आहे. तेव्हा मोठ्या संख्येने शिल्लक कागदपत्रांची पडताळणी कशी आणि कधी पूर्ण होणार, असा प्रश्न निर्माण झाल्याची माहिती पुणे मंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.
या पार्श्वभूमीवर पुन्हा सोडतपूर्व प्रक्रियेस मुदतवाढ घ्यावी लागण्याची दाट शक्यता आहे. याविषयी पुणे मंडळाचे मुख्य अधिकारी राहुल साकोरे यांना विचारले असता, याबाबत म्हाडा उपाध्यक्षांशी चर्चा केली जाईल आणि त्यानंतरच मुदतवाढीबाबतचा अंतिम निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी सांगितले.
