मुंबई : मुंबईसह राज्यात सुरू असलेल्या बाइक टॅक्सीवर बंदी घालण्यासह ॲपआधारित टॅक्सीसेवेच्या दरावरून चालक आक्रमक झाले आहेत. पुण्याहून मुंबईला पदयात्रा केलेले तीन चालक सरकारमान्य दर लागू करण्याच्या मागणीसाठी सोमवार, २० एप्रिलपासून आझाद मैदानात उपोषण करणार आहेत. मुंबईसह नागपूरमधील संविधान चौक आणि पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालय येथे एकाच वेळी आंदोलन करण्यात येणार आहे.
राज्याचे सहायक परिवहन आयुक्त भरत कळसकर यांच्या अध्यक्षतेखाली ॲपआधारित टॅक्सीसेवा देणाऱ्या ‘ओला’, ‘उबर’, ‘रॅपिडो’ कंपनी प्रतिनिधींसह भारतीय गिग कामगार मंचाची बैठक परिवहन आयुक्त कार्यालयात दोन दिवसांपूर्वी पार पडली. बैठकीत सरकारमान्य दर लागू करण्याबाबत सविस्तर चर्चा झाली.
यावेळी ‘रॅपिडो’ ने चालकांचे आर्थिक नुकसान होत असल्याचे मान्य केले. त्यासाठी भरपाई देण्याची तयारीही दर्शवली. चालकांनी ट्रीपचे स्क्रीनशॉट सादर करण्यासाठी ‘गुगल फॉर्म’ तयार करण्यात येणार आहे. त्यानुसार रक्कम थेट संबंधित चालकांच्या खात्यात जमा करण्यात येईल, असे कंपनीच्या प्रतिनिधींनी स्पष्ट केले.
‘ओला’ आणि ‘उबर’ यांनी दरांमध्ये बदल करण्याबाबत निर्णय घेण्यासाठी मुदत मागितली, मात्र त्यानंतर चालकांच्या भरपाईबाबत ठाम भूमिका घेतली नाही. यामुळे चालकांमध्ये नाराजी आहे. १७ एप्रिलपर्यंत अपेक्षित निर्णय न झाल्याने १८ एप्रिलपासून आंदोलनाचा निर्णय घेण्यात आला होता.
मात्र, शनिवार-रविवारी आझाद मैदानात आंदोलनास परवानगी मिळाली नाही.त्यामुळे सोमवारपासून आझाद मैदानात उपोषण करण्यात येणार आहे. राज्य सरकारने रिक्षा व टॅक्सींसाठी निश्चित केलेले मीटरदर ॲपमध्ये लागू करण्याच्या मागणीसाठी १० एप्रिल रोजी तीन चालकांनी पुणे ते मंत्रालय दरम्यान पायी पदयात्री सुरू केली होती.
‘ओला’, ‘उबर’ आणि ‘रॅपिडो’कडून सरकारच्या आदेशांचे सातत्याने उल्लंघन होत आहे. चालकांच्या मेहनतीनुसार योग्य दर मिळेपर्यंत आंदोलन सुरू राहील. – डॉ. केशव क्षीरसागर ,अध्यक्ष, महाराष्ट्र कामगार सभा.
सहा दिवस पुणे-मुंबई पदयात्रा
पुणे-मुंबईदरम्यानचे १५५ किमीचे अंतर वैभव भेंगडे, संतोष बुरगे आणि परमेश्वर गोंगे या तीन चालकांनी सहा दिवसांत पायी पार केले. राज्य सरकारने रिक्षा व टॅक्सींसाठी निश्चित केलेले मीटरदर ॲपमध्ये लागू करण्याच्या मागणीसाठी १० एप्रिल रोजी या तीन चालकांनी पुणे ते मंत्रालयदरम्यान पदयात्रा सुरू केली होती. पदयात्रेदरम्यान अंगावर लावलेल्या फलकांमुळे आंदोलन चर्चेत आले.
प्रती किमी दर
- काळी पिवळी टॅक्सीं – २०.६६ रुपये
- कॅब – २२.७५ रुपये
- किमान दर ( १.५ किमी)
- छोटी गाडी – २८ रु
- मध्यम गाडी – ३१ रु
- मोठी गाडी – ३४ रु.
