मुंबई पुण्यावरून प्रस्तावित पुरंदर विमानतळाला अतिजलद पोहोचणे सोपे व्हावे यासाठी राज्य सरकारने हडपसरपासून पुरंदर विमानतळापर्यंत अंदाजे १० किमीचा दुहेरी बोगदा बांधण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार हा बोगदा पुणे-सासवड मार्गावरील दिवे घाटाखालून जाणार असून या दुहेरी बोगद्याचे वैशिष्ट्य म्हणजे या बोगद्यातून एका बाजूने मेट्रो तर दुसऱ्या बाजूने वाहने धावणार आहेत. या बोगद्यामुळे भविष्यात पुण्यावरून पुरंदर विमानतळाला काही मिनिटांत पोहोचता येणार आहे.
अशा या प्रकल्पाचा व्यवहार्यता अभ्यास आणि सविस्तर आराखडा महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशनकडून (महामेट्रो) तयार केला जाणार आहे. त्यानुसार यासाठी सल्लागाराची नियुक्ती करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. मात्र त्याचवेळी महामेट्रोबरोबर संयुक्तपणे या प्रकल्पाच्या अंमलबजावणी नेमकी कोणती यंत्रणा करणार याबाबत अनिश्चितता आहे. असे असताना महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी) वा महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ (एमएसआयडीसी) यांच्याकडे ही जबाबदारी दिली जाण्याची चर्चा आहे.
**लोहगाव विमानतळावरील ताण कमी करण्यासाठी, पुण्यात आंतरराष्ट्रीय विमान सेवा सुरू करण्यासाठी छत्रपती संभाजीराजे आंतरराष्ट्रीय विमानतळ, पुरंदर बांधण्यात येणार आहे. त्यादृष्टीने कार्यवाही सुरू आहे. तेव्हा पुण्यावरून या विमानतळाला अतिजलद पोहोचता यावे यादृष्टीने काय करता येईल, यातून दुहेरी बोगद्याची संकल्पना पुढे आली आहे. त्यानुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वी या प्रकल्पाची घोषणा केली आहे. या घोषणेनुसार पुणे-सासवड महामार्गावरील दिवे घाटातून दुहेरी बोगदा जाणार असून हे बोगदे सेवेत दाखल झाल्यास पुणे ते पुरंदर विमानतळ प्रवास काही मिनिटांवर येणार असल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान, हा प्रकल्प अंदाजे १० किमीचा असणार असला तरी प्रकल्प नेमका कुठून सुरू होणार आणि कुठे संपणार, बोगद्याचा मार्ग नेमका कसा असणार आहे, हे सर्व प्रकल्पाची व्यवहार्यता तपासणी आणि आराखडा पूर्ण झाल्यानंतरच स्पष्ट होईल, अशी माहिती महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांनी लोकसत्ताला दिली. व्यवहार्यता तपासणी आणि आराखड्याच्या कामासाठी सल्लागाराची नियुक्ती करण्याची प्रक्रिया सुरू असून लवकरच ही प्रक्रिया पूर्ण केली जाईल. त्यानंतर व्यवहार्यता तपासणी आणि आराखड्याच्या कामाला सुरुवात होईल. या कामाला आणखी ६ ते ८ महिने जाण्याची शक्यता आहे. आराखडा तयार झाल्यानंतरच या प्रकल्पाबाबत स्पष्टता येईल, असेही त्यांनी सांगितले. **
दुहेरी बोगद्याचे वैशिष्ट्य म्हणजे या बोगद्यातून एका बाजूने मेट्रो तर दुसऱ्या बाजूने वाहने धावणार आहेत. त्यामुळे मेट्रो आणि वाहनांचा भुयारी प्रवास या प्रकल्पामुळे होणार आहे. हर्डीकर यांनी सांगितल्याप्रमाणे आराखड्याचे, व्यवहार्यता तपासणीचे पूर्ण काम महामेट्रोकडून केले जाणार आहे. मेट्रोसाठीच्या बोगद्याचे कामही महामेट्रोकडूनच केले जाणार आहे. मात्र वाहनांसाठीचा बोगदा कोण बांधणार की ती जबाबदारीही महामेट्रोकडे असणार याबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. याबाबत राज्य सरकारच निर्णय घेईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
एमएसआयडीसी अनभिज्ञ दुसरीकडे मात्र या प्रकल्पातील वाहनांच्या बोगद्याच्या बांधकामाची जबाबदारी एमएसआयडीसीकडे असणार असल्याची माहिती पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी लोकसत्ताला दिली. तशी चर्चा झाल्याचेही त्यांनी सांगितले. त्यानुसार एमएसआयडीसीचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित यांना विचारले असता त्यांनी या प्रकल्पाच्या अंमलबजावणीबाबत कोणतीही चर्चा झालेली नाही वा असा कोणताही निर्णय झालेला नाही, असे त्यांनी सांगितले. दरम्यान, एमएमआरडीसीनेही हा प्रकल्प अद्याप आपल्याकडे आला नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे महामेट्रोसह संयुक्तपणे या प्रकल्पाच्या अंमलबजावणीची जबाबदारी कोणाकडे असणार हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे.
