मुंबई : अंमली पदार्थांशी संबंधित गंभीर गुन्ह्यांच्या सुनावणीला गती देऊन प्रकरणांचा कालबद्ध पद्धतीने निपटारा करण्यासाठी पुणे येथे विशेष न्यायालय सुरु करण्यात आले आहे. नार्कोटिक ड्रग्स अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस (एनडीपीएस) कायद्यांतर्गत या विशेष न्यायालयाची स्थापना करण्यात आली. अंमली पदार्थांच्या वाढत्या धोक्याला आळा घालण्यासाठी तपास, अभियोजन आणि न्यायालयीन प्रक्रियेला अधिक प्रभावी करण्याच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री व गृहमंत्री असताना या विशेष न्यायालयाच्या स्थापनेसाठी त्यांनी पुढाकार घेतला होता. अंमली पदार्थांशी संबंधित प्रकरणांची सुनावणी नियमित न्यायालयांमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रलंबित राहू नये आणि अशा गंभीर गुन्ह्यांमध्ये आरोपींवरील खटल्यांचा वेळेत निकाल लागावा, या उद्देशाने त्यांनी विशेष न्यायालय स्थापन करण्याबाबत निर्देश दिले होते. या अनुषंगाने विशेष न्यायालय स्थापनेसाठी आवश्यक असलेला सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करून केंद्र सरकारच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाकडे सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. प्रस्तावाच्या मंजुरीसाठी केंद्र सरकारकडे वैयक्तिक स्तरावर पाठपुरावा करण्याचे निर्देशही फडणवीस यांनी दिले होते. प्रशासकीय, कायदेशीर तसेच संस्थात्मक बाबींचा विचार करून या प्रक्रियेला गती देण्यात आली.
अंमली पदार्थांशी संबंधित गुन्ह्यांचे स्वरूप गंभीर आणि संवेदनशील असते. या प्रकरणांमध्ये तपासानंतर पुरावे न्यायालयात सादर करणे, साक्षीदारांची साक्ष नोंदविणे आणि संबंधित न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करणे यासाठी बराच कालावधी लागतो. विशेष न्यायालयामुळे अशा प्रकरणांना प्राधान्याने हाताळण्यास मदत होऊन प्रलंबित खटल्यांचा निपटारा जलद होण्याची अपेक्षा आहे. तरुण पिढीला अंमली पदार्थांच्या विळख्यातून दूर ठेवणे, अमली पदार्थांची तस्करी व अवैध व्यवहार रोखणे आणि गुन्हेगारांविरुद्ध प्रभावी कारवाई करणे, या व्यापक उद्देशाने न्यायालयीन प्रक्रियेला गती देण्यावर भर देण्यात आला आहे. अंमली पदार्थ मुक्त महाराष्ट्र करण्याची ग्वाही फडणवीस यांनी दिली आहे. पुण्यात विशेष न्यायालय स्थापन झाल्याने अंमली पदार्थांविरोधातील राज्याच्या कारवाईला न्यायालयीन पातळीवरही बळ मिळणार आहे.
