मुंबई : पुणे ग्रँड टूर २००६ स्पर्धेच्या यशस्वी आयोजनानंतर आता ‘युनियन सायक्लिस्ट इंटरनॅशनल’ (युसीआय) रोड वर्ल्ड चॅम्पियनशिप २०३२ चे यजमानपद पुण्याला मिळणार आहे. या स्पर्धेच्या संयोजनासाठी मंगळवारी मंत्रिमंडळाने मान्यता दिली. या स्पर्धेच्या निमित्ताने आशियातील पहिले यजमान पद भारताला मिळणार आहे. स्पर्धेच्या माध्यमातून ३३० कोटी रुपयांची आर्थिक उलाढाल होईल अशी अपेक्षा आहे.

पुणे ग्रँड टूर स्पर्धेच्या आयोजनामुळे महाराष्ट्राच्या क्रीडा लौकिकात भर पडली. स्पर्धेतील उत्कृष्ट नियोजन, आंतरराष्ट्रीय दर्जाची अंमलबजावणी, सुरक्षा व्यवस्थापन व तांत्रिक क्षमतेची जागतिक स्तरावर दखल घेण्यात आली. या पार्श्वभूमीवर पुण्याला सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडिया (सीएफआय) व पुणे ग्रँड टूर आयोजन समितीला युसीआय रोड वर्ल्ड चॅम्पियनशिप २०३२ ची संधी मिळणार आहे. या स्पर्धेमुळे किमान १०० देशातील २५ ते ३० कोटी क्रीडा रसिकांपर्यंत महाराष्ट्राची क्रीडा संस्कृती पोहचणार आहे.

या स्पर्धेच्या माध्यमातून पुणे जिल्ह्याला दख्खनचे प्रवेशद्वार (गेट वे टू डेक्कन) या संकल्पनेतून जागतिक सायकलिंगच्या नकाशावर स्थान मिळणार आहे. जागतिक किर्तीच्या ‘टूर द फ्रान्स’च्या धर्तीवर आयोजित होणारी ही स्पर्धा पुणे जिल्ह्यतील २५० ते २८० किमी लांबीच्या रस्त्यांवर पार पडेल. त्यामध्ये जगभरातून एक हजार खेळाडू सहभागी होतील. आठ दिवस ही स्पर्धा चालणार आहे. या स्पर्धेच्या नियोजनासाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात येईल.

स्पर्धेच्या माध्यमातून क्रीडा पर्यटनाला चालना मिळणार आहे. त्यातून राज्याला ३३० कोटी रुपयांचा महसूल निर्माण होईल. स्थानिक सायकलपटूंना आंतरराष्ट्रीय व्यासपीठ उपलब्ध होणार आहे. स्पर्धेसाठी ९९ कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. त्यामध्ये तांत्रिक मनुष्यबळ, वैद्यकीय चमू, विविध वाहने, अंमली पदार्थविरोधी यंत्रणा यासाठी १६ कोटी, उद्घघाटन, अंतीम सोहळा, व्यवस्थापन यासाठी ६९ कोटी, प्रसिद्धी १२ कोटी या खर्चाचा त्यामध्ये समावेश आहे. हा खर्च सामाजिक उत्तरदायित्व निधीमधून (सीएसआर) उभा करण्यात येणार आहे.