मुंबई : गणेशोत्सवातील डीजे आणि ध्वनिप्रदूषणाच्या मुद्द्यावर भूमिका मांडणारे सामाजिक कार्यकर्ते विद्यानंद बापट यांना पुण्यात झालेल्या मारहाणीचे समर्थन करता येणार नाही. एखाद्याचे मत पटत नसले तरी प्रत्येकाला आपले मत मांडण्याचा अधिकार आहे. अशा पद्धतीने कोणालाही मारहाण करणे योग्य नाही, अशी स्पष्ट भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी मुंबईत व्यक्त केली.
पुण्यासारख्या शहरात अशा प्रकारचा वाद निर्माण होणे योग्य नाही. एकमेकांच्या भावना समजून घेण्याची आवश्यकता आहे. गणेशोत्सव अधिक पारंपरिक पद्धतीने पुढे नेण्याच्या दृष्टीने पावले उचलली पाहिजेत, असे त्यांनी स्पष्ट केले.
गणेशोत्सव पारंपरिक पध्दतीने साजरा झाला पाहिजे. हा बदल पहिल्याच वर्षी शंभर टक्के यशस्वी होईल असे नाही. तो शंभर टक्के यशस्वी करण्याच्या दिशेने सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत, असे मत फडणवीस यांनी व्यक्त केले. मारहाण करणाऱ्याच्या विरोधात कठोर कारवाई केली जाईल, असेही फडणवीस यांनी सांगितले.
उत्सवाला गालबोट नको : शिंदे
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही बापट यांच्यावरील हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सवाच्या सांस्कृतिक महत्त्वावर भर दिला. गणेशोत्सव हा महाराष्ट्राची परंपरा आणि संस्कृतीचा मोठा सण आहे. या उत्सवाला कोणत्याही प्रकारे गालबोट लागता कामा नये. ही परंपरा आणि संस्कृती जोपासण्याचा प्रयत्न सर्व नागरिकांनी केला पाहिजे, गणेशोत्सव साजरा करताना नागरिकांना त्रास होईल किंवा गैरसोय निर्माण होईल, असे कोणतेही वर्तन कोणी करू नये, ही सरकारची आणि आमची भूमिका असल्याचे शिंदे यांनी स्पष्ट केले.
