मुंबई : तीन वर्षांपूर्वी पुण्यातील तरूणीच्या मृत्यूप्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे नेते संजय राठोड यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी फौजदारी जनहित याचिका केली आहे. मात्र, ही याचिका राजकीयदृष्ट्या प्रेरित असून कुटुंबीयांची बदनामी होत आहे. त्यामुळे, ही बदनामी थांबवा, अशी विनंती या तरूणीच्या वडिलांतर्फे मंगळवारी उच्च न्यायालयात करण्यात आली.

वाघ यांनी केलेल्या याचिकेत तरूणीच्या वडिलांनी हस्तक्षेप अर्ज केला आहे. तसेच, याचिकेवर कोणताही निर्णय घेण्यापूर्वी आपले म्हणणे ऐकण्याची विनंती केली आहे. मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती अमित बोरकर यांच्या खंडपीठासमोर हा अर्ज मंगळवारी सादर करण्यात आला. त्यावेळी, आपला कोणाविरुद्ध राग किंवा तक्रार नाही. आपल्या मुलीच्या मृत्यूप्रकरणी दाखल जनहित याचिका राजकीय हेतूने प्रेरित आहे. आपल्याला चार मुली आहेत आणि प्रत्येकवेळी याचिका सुनावणीस येते तेव्हा प्रसारमाध्यमांमध्ये त्याबाबतचे वृत्त प्रसिद्ध होते. परिणामी, त्याचा आपल्या कुटुंबातील सदस्यांना त्रास होतो व त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते, तसेच, या याचिकेमुळे मुलींचे विवाह होण्यास व्यत्यय येत आहे, असे मृत तरूणीच्या वडिलांच्या वतीने वकील प्रणव बडेका यांनी न्यायालयात सांगितले. त्यामुळे आपल्याला कोणतीही मदत नको, पण आपल्या कुटुंबाची होणारी बदनाम थांबवावी, अशी मागणीही अर्जदाराच्या वतीने न्यायालयाकडे करण्यात आली.

हेही वाचा…मुंबई: स्वातंत्र्यदिनापूर्वी नाकाबंदीत सापडले दोन कोटींचे एमडी, एकाला अटक, दोघांचा शोध सुरू

टिकटॉक व्हिडोओसाठी प्रसिद्ध असलेल्या पुण्यातील तरूणीचा ८ फेब्रुवारी २०२१ रोजी इमारतीच्या पहिल्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला होता. या तरूणीचे नाव संजय राठोड यांच्याशी जोडले गेल्याने राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले होते. तरूणीच्या राठोड यांच्याशी झालेल्या फोनवरील संभाषणाच्या ११ ध्वनीचित्रफिती समाजमाध्यमांवर प्रसारित झाल्या होत्या. या प्रकरणानंतर राठोड यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला असला तरी त्याच्याविरोधात गंभीर आरोप असतानाही अद्याप गुन्हा दाखल केलेला नाही, असा आरोप चित्रा वाघ यांनी केला होता. तसेच, राठोड यांच्यावर फौजदारी कारवाई करण्याच्या आणि प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्याच्या मागणीसाठी याचिका केली होती. भाजप यांच्या साथीने शिंदे सरकार सत्तेत असल्याने वाघ यांनी याचिका मागे घेण्यास किंवा निकाली काढण्याची मागणी केली होती. मात्र, जनहित याचिकांचा वापर राजकारण करण्यासाठी करू नये, अशा शब्दांत न्यायालयाने वाघ यांना फटकारले होते. त्यानंतर, वाघ यांनी याचिकेवर युक्तिवाद करणार असल्याचे स्पष्ट केले होते.