धूर्त जगरहाटीपासून दूर असलेल्या तीन भावांची कथा. रतन, चंदन आणि मदन या कुरळे बंधूंनी २००७ साली प्रदर्शित झालेल्या ‘साडे माडे तीन’ या चित्रपटातून प्रेक्षकांना खळखळून हसवले होते. आता जवळपास दोन दशकांनी त्यांची कथा पुन्हा प्रेक्षकांसमोर आणताना लेखक – दिग्दर्शक म्हणून अंकुश चौधरीने कथाकथनाच्या तंत्रातही बराच बदल केला आहे. या तीन भावांची आणि त्यांच्याबरोबर जोडल्या गेलेल्या बबनची गंमत पडद्यावर रंगवताना एका नवीन पात्राची रचना आणि तिची गोष्ट यात जोडली गेली आहे. त्यामुळे पहिल्यापेक्षा थोड्या वेगळ्या पद्धतीने ही रंजक कथा पुन्हा एकदा पाहायला मिळाली असली, तरी त्यात असलेल्या तीन कलाकारांचा हुकूमी एक्का म्हणजे त्यांच्या विनोदाची मात्रा अजून असायला हवी होती असं वाटत राहातं.

‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’ या चित्रपटाची सुरुवातच कामिनी या नव्या पात्राच्या प्रवेशाने आणि तिच्या गोष्टीने होते. कामिनीच्या मागे काही गुंड लागले आहेत. ॲम्बेसेडर मोटरगाडी वेगाने चालवत सुटकेच्या प्रयत्नात असलेल्या कामिनीच्या गाडीला गुंड घेरतात. त्याच्या पुढच्याच दृश्यात आपल्याला कुरळे ब्रदर्सचं देखणं, नेटकं गॅरेज दिसतं. आणि आपल्या नेहमीच्या निरागसतेने काम करणारा चंदन आणि त्याला आपल्या हुशारीने नेहमी मुर्ख बनवणाऱ्या मदन या दोन भावांचं दर्शन होतं. हे दोघंही एकमेकांना त्याच ओळखीच्या ढंगात चंदन…मदन अशी हाक मारतात आणि प्रेक्षकांना पहिल्या चित्रपटाची आठवण होते. तब्बल १९ वर्षांनी आलेल्या या सिक्वेलपटाच्या निमित्ताने आपल्या जुन्या पात्रांचा सूर भरत जाधव आणि मकरंद अनासपुरे या दोघांनीही अचूक पकडला आहे. या दोघा भावांची गंमत आणखी पाहायला मिळणार, अशी आपली अपेक्षा वाढत जाते. पण, इथेच कामिनीची गोष्ट सुरू होते. रात्री गुंडांपासून वाचण्याच्या प्रयत्नात कामिनी कुरळे ब्रदर्सच्या गॅरेजमध्ये शिरते. चंदनची गॅरेजमधली रात्रपाळी असल्याने त्याला कामिनी पहिल्यांदा भेटते. गुंडांपासून तिला चंदन गाडीत लपवतो खरा… पण दादाला काय सांगायचं? या विचाराने त्याची भंबेरी उडते. त्याचा गोंधळ सवयीने मदनच्या लक्षात येतो. बबनलाही काहीतरी गडबड जाणवते. मग पुढे ही गोष्ट दादांपर्यंत जाते का? या सगळ्या गोंधळात कामिनीच्या मागे गुंडांचा ससेमिरा का लागला आहे? कामिनीमुळे कुरळे ब्रदर्स अडचणीत येणार का? अशा अनेक प्रश्नांची उत्तरं देत ‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’ हा चित्रपट दिग्दर्शक अंकुश चौधरी यांनी रंगवला आहे.

पहिल्या ‘साडे माडे तीन’ चित्रपटाची कथा ही अभिनेते संजय मोने यांनी लिहिली होती. तीन भाऊ, मोठा सगळ्यात हुशार. स्त्रिया नेहमीच पुरुषांना धोका देतात, या धारणेतून आपल्या दोन्ही भावांनाही त्यांच्यापासून दूर ठेवणारा कडक शिस्तीचा रतन दादा आणि प्रेमात पडलेल्या चंदन-मदनची दादापासून ही गोष्ट लपवण्याची धडपड यातून त्या चित्रपटातलं विनोदी नाट्य जन्माला आलं होतं. नव्याने या चित्रपटाची मांडणी करताना काहीशी रहस्यमय किंवा आत्ताच्या प्रचलित चित्रपटांप्रमाणे विनोदी-भय नाट्यशैलीत ही कथा अंकुश चौधरीने लिहिली आहे. काळ बदलला असला तरी या तिन्ही भावांचा मूळ स्वभाव कायम आहे. आजच्या काळात अतिशय प्रामाणिक असलेल्या या तीन भावांच्या आयुष्यात एखादी व्यक्ती आली आणि तिच्या बाबतीत घडलेल्या गोष्टीत ते अडकले तर काय होईल, असा सर्वसाधारण विचार करत या चित्रपटाची मांडणी केली आहे. नवीन कथा पुरेशी रंजक आहे, काहीएक वेगळेपण जोडलं असल्याने थोडी गुंतागुंत यात अधिक आहे. पण, त्या नादात चित्रपटात दाखल झालेल्या नव्या पात्रांमुळे मूळ तिघांमधली किंबहुना चंदन आणि मदनमधली धमाल थोडी कमी झाली आहे. बाकी अभिनेता सिद्धार्थ जाधवची वैशिष्ट्यं, आत्ताचं त्याचं व्यक्तिमत्त्व याचा व्यवस्थित उपयोग करून घेत बबनच्या व्यक्तिरेखेला दिग्दर्शकाने वळण दिलं आहे. त्यामुळे चित्रपट एकसुरी वाटत नसला तरी कथा ही आजच्या चित्रपटांच्या तुलनेत सरधोपट आहे. त्यातलं रहस्यही प्रेक्षकाला पहिल्या काही दृश्यात उलगडलेलं असतं. त्यामुळे साधारणपणे ही तिन्ही भावंडं आणि बबनची करामत यातून ते कथा सुफळ संपूर्ण कशी करतात हे पाहणं इतकीच त्यातली गंमत मर्यादित झाली आहे.

काही प्रमाणात गोष्टीचा विचार करता रोहित शेट्टीच्या ‘गोलमाल अगेन’ची आठवण होते. तरी तिर्री तिर्री बाबा पाहताना ‘हाऊसफुल्ल ४’मधल्या गाण्याची आठवण होते. वर म्हटलं तसं चंदन आणि मदन यांचं आजचं वय लक्षात घेत अभिनेता भरत जाधव आणि मकरंद अनासपुरे या दोघांनीही त्यांच्या भूमिका उत्तम पकडल्या आहेत. मदनचा खट्याळपणा, त्याच्या खोड्या आणि त्याच्या चेहऱ्यावर उमटणारं मिश्कील हसू हे सगळं ज्या सहजतेने मकरंद अनासपुरे यांनी रंगवलं आहे ते पाहताना मजा येते. हीच ती गंमत… असं आपल्याला वाटतं. अशोक सराफ यांचा नुसता वावरही कायम प्रभावी ठरतो. बबनच्या भूमिकेत सिद्धार्थ जाधव नेहमीप्रमाणे लक्ष वेधून घेतो. तर कामिनीची भूमिका रिंकू राजगुरूने नेहमीच्या सहजतेने साकारली आहे. रिंकूला या तिघांबरोबर अधिक वाव मिळायला हवा होता. कदाचित त्यातून अधिक गंमत वाढली असती. बाकी संजय जाधव यांचा तिर्री तिर्री बाबा आणि समाज माध्यमांवरचे लाडके कलाकारही काही क्षणांसाठी मनोरंजन करून जातात. हा भाग तसा उगाच जोडलेला वाटतो. तरीही दोन तासांचा हा सुटसुटीत सीक्वेलपट प्रेक्षकांचं माफक मनोरंजन करतो यात शंका नाही.

दिग्दर्शक – अंकुश चौधरी

कलाकार – अशोक सराफ, भरत जाधव, मकरंद अनासपुरे, रिंकू राजगुरू, सिद्धार्थ जाधव, संजय जाधव, समृद्धी केळकर आणि संकेत पाठक