मुंबई : क्यूएस जागतिक क्रमवारीमध्ये देशातील उच्च शिक्षण संस्थांच्या क्रमवारीमध्ये सुधारणा व्हावी यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाकडून विविध प्रयत्न करण्यात येत आहेत. क्यूएस जागतिक क्रमवारी २०२७ च्या प्रक्रियेमध्ये सहभागी होण्यासाठीची सादरीकरण प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या क्रमवारीमध्ये सहभागी होण्यासाठी पात्र व इच्छुक असलेल्या उच्च शिक्षण संस्थांनी १२ एप्रिलपर्यंत क्यूएस हब पोर्टल या संकेतस्थळावर माहिती सादर करावी, अशा सूचना केंद्र सरकारच्या शिक्षण मंत्रालयाकडून देशातील सर्व उच्च शिक्षण संस्थांना देण्यात आल्या आहेत. तसेच उच्च शिक्षण संस्थांनी निर्धारित वेळेत माहिती सादर करावी, असे आवाहन केंद्र सरकारकडून करण्यात आले आहे.

क्यूएस जागतिक विद्यापीठ क्रमवारी प्रतिष्ठित मानली जाते. या क्रमवारीमध्ये स्थान मिळवण्यासाठी संस्थांनी आपली शैक्षणिक, संशोधन, पायाभूत सुविधा तसेच शाश्वतता संदर्भातील माहिती सादर करणे आवश्यक असते. ही माहिती सादर करण्याची प्रक्रिया क्यूएस या कंपनीकडून सुरू करण्यात आली असून, १२ एप्रिलपर्यंत ही माहिती भरण्यासाठी मुदत देण्यात आली आहे.

त्याआधी सर्व माहिती सादर करणे बंधनकारक आहे. त्यामुळे देशातील पात्र व इच्छुक उच्च शिक्षण संस्थांनी आवश्यक संस्थात्मक माहिती ‘क्यूएस हब पोर्टल’ या ऑनलाइन संकेतस्थळावर सादर करावी, माहिती सादर करताना अचूकता आणि वेळेचे पालन यावर विशेष भर द्यावा, अशा सूचना शिक्षण मंत्रालयाकडून सर्व संबंधित संस्थांना करण्यात आल्या आहेत. वेळेत आणि अचूक माहिती सादर केल्यास जागतिक क्रमवारीमध्ये संस्थांना योग्य सहकार्य करण्यास मदत होणार असल्याचे शिक्षण मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आले.

शिक्षण क्षेत्रातील स्पर्धात्मकता वाढविण्यासाठी आणि भारतीय उच्च शिक्षण संस्थांना जागतिक स्तरावर अधिक दृश्यमानता मिळवून देण्यासाठी ही प्रक्रिया महत्त्वाची मानली जात आहे. देशातील अधिकाधिक उच्च शिक्षण संस्थांनी क्यूएस क्रमवारीमध्ये स्थान मिळावे यासाठी केंद्र सरकारकडूनही प्रयत्न करण्यात येत आहेत. त्यामुळे सर्व संबंधित संस्थांनी आवश्यक ती कार्यवाही तात्काळ करावी, असे आवाहन उच्च शिक्षण मंत्रालयाचे सचिव मनिष जोशी यांनी परिपत्रकाद्वारे केले आहे.

क्यूएस क्रमवारी २०२६ मध्ये गुणवत्तेचा आलेख चढा

काही दिवसांपूर्वी क्यूएसने जाहीर केलेल्या विषयानुरूप शैक्षणिक संस्थांच्या क्रमवारीमध्ये भारतातील सहा संस्थांनी पहिल्या ५० संस्थांमध्ये स्थान मिळवले आहे. यामध्ये चार भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी), जवाहरलाल नेहरू विद्यापीठ (जेएनयू) आणि बिर्ला इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड सायन्स पिलानी (बिट्स पिलानी) यांचा जगातील ५० अव्वल संस्थांमध्ये समावेश झाला आहे. यावरून भारतीय शिक्षण व्यवस्थेच्या गुणवत्तेचा चढता आलेख अधोरेखित झाला आहे.