मुंबई : जागतिक स्तरावरील शैक्षणिक संस्थांची क्रमवारी ठरविणाऱ्या क्यूएस क्रमवारीमध्ये यंदा भारतीय संस्थांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. क्यूसने जाहीर केलेल्या विषयानुरूप शैक्षणिक संस्थांच्या क्रमवारीमध्ये भारतातील सहा संस्थांनी पहिल्या ५० संस्थांमध्ये स्थान मिळवले आहे. यामध्ये चार भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी), जवाहरलाल नेहरू विद्यापीठ (जेएनयू) आणि बिर्ला इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड सायन्स पिलानी (बिट्स पिलानी) यांचा जगातील ५० अव्वल संस्थांमध्ये समावेश झाला आहे. यावरून भारतीय शिक्षण व्यवस्थेच्या गुणवत्तेचा चढता आलेख ठसठशीतपणे अधोरेखित झाला आहे.

लंडनस्थित क्यूएस क्वाकरेल्ली सायमंड्स ही संस्था दरवर्षी जगभरातील उच्चशिक्षण संस्थांचे गुणांकन आणि मूल्यांकन करते. त्यानुसार या संस्थेने १६ व्या वार्षिक क्रमवारीमध्ये जगभरातील १०० हून अधिक देशांतील सुमारे १९०० विद्यापीठांमधील २१ हजारांहून अधिक अभ्यासक्रमांचे मूल्यमापन केले. यामध्ये ५५ विषय आणि पाच प्रमुख शैक्षणिक क्षेत्रांचा समावेश आहे. यंदाच्या क्रमवारीत भारताने विविध विषयांमध्ये तब्बल २७ वेळा पहिल्या ५० मध्ये स्थान मिळवले असून, ही संख्या गेल्या वर्षीच्या तुलनेत दुपटीहून अधिक आहे. विशेष म्हणजे, ही कामगिरी देशातील १२ संस्थांनी साध्य केली आहे. या यादीत आयआयटी मुंबई, आयआयटी दिल्ली, आयआयटी खरगपूर आणि आयआयटी मद्रास यांसारख्या अग्रगण्य आयआयटींचा समावेश आहे.

आयआयटी दिल्ली आणि मुंबई यांनी सहा विषयांमध्ये पहिल्या ५० मध्ये स्थान मिळवत सर्वाधिक सर्वसमावेशक कामगिरी नोंदवली आहे. केमिकल इंजिनीअरिंगमध्ये प्रथमच पहिल्या ५० मध्ये प्रवेश, तसेच आयआयटी दिल्लीने केमिकल इंजिनीअरिंग (४८वा), इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक इंजिनीअरिंग (३६वा), मेकॅनिकल, एरोनॉटिकल अँड मॅन्युफॅक्चरिंग इंजिनीअरिंग (४४वा) आणि इंजिनीअरिंग अँड टेक्नॉलॉजी (३६वा) या विषयांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली आहे. तसेच कॉम्प्युटर सायन्समध्ये ४५ व्या क्रमांकासह आयआयटी दिल्लीने देशात दुसरे स्थान पटकावले आहे.

व्यवस्थापन व खनन क्षेत्रातही चमक

व्यवस्थापन शिक्षणात आयआयएम अहमदाबादने बिझनेस अँड मॅनेजमेंट स्टडीज आणि मार्केटिंग या दोन्ही विषयांत २१ वे स्थान मिळवले आहे. विशेष म्हणजे, मार्केटिंग विषयात भारताने प्रथमच जागतिक क्रमवारीत स्थान मिळवले आहे. तसेच इंडियन स्कुल ऑफ माईन्स धनबाद (आयएसएम धनबाद) या संस्थेने खनिजे व खनिकर्म अभियांत्रिकीमध्ये २१ वे स्थान मिळवत जागतिक स्तरावर आपली छाप पाडली.

भारताची प्रगती संख्यात्मक नव्हे तर गुणात्मक

भारताची ही प्रगती केवळ संख्येची नसून गुणवत्ता आणि जागतिक स्पर्धात्मकतेतही वाढ दर्शवते. अभियांत्रिकी, तंत्रज्ञान आणि व्यवस्थापन क्षेत्रातील सुधारणा देशाच्या वेगाने होणाऱ्या प्रगतीचे संकेत आहेत, असे क्यूएसच्या मुख्य कार्यकारी अधिकारी जेसिका टर्नर यांनी सांगितले. संशोधनाची ताकद वाढवणे, जागतिक सहकार्य विस्तार करणे आणि संस्थांची वैशिष्ट्ये अधिक ठळक करणे, ही पुढील टप्प्यातील महत्त्वाची आव्हाने असतील, असे त्यांनी नमूद केले.