scorecardresearch

राज्यातील राजकारणाचे चौकोनी विचारसंमेलन; ‘लोकसत्ता दृष्टी आणि कोन’ उपक्रमात स्थानिक निवडणुकांचा वेध

करोनामुळे गेली दोन वर्षे कठोर आव्हानांचा सामना केल्यावर आता कुठे सारे सुरळीत होऊ लागले आहे.

मुंबई : आगामी महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदा या ‘प्रति विधानसभा’ मानल्या जाणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तापू लागलेल्या राज्यातील राजकारणाचा आढावा घेणारे चौकोनी विचारसंमेलन ‘लोकसत्ता’च्या वतीने येत्या सोमवारपासून ‘दृष्टी आणि कोन’ या दूरसंवाद मालिकेतून घेतले जाणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, भाजप नेते आमदार आशीष शेलार व राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे हे चार दिवस स्वतंत्रपणे आपापल्या पक्षांविषयी विचार सादर करतील.

करोनामुळे गेली दोन वर्षे कठोर आव्हानांचा सामना केल्यावर आता कुठे सारे सुरळीत होऊ लागले आहे. राजकीय वातावरण तापू लागले. राजकीय सभा, मेळावे सुरू झाले. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या. राज्यातील १५ महानगरपालिका, २०० पेक्षा अधिक नगरपालिका, २५ जिल्हा परिषदा आणि २०० पेक्षा अधिक पंचायत समित्यांच्या निवडणुकांचे पडघम एव्हाना वाजू लागले आहेत. निवडणुकांच्या तुताऱ्या फुंकल्या गेल्या आहेत.  महाविकास आघाडी सरकारचा निम्मा कार्यकाळ लवकरच संपेल. लवकरच होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या माध्यमातून राज्यातील राजकीय वारे कोणत्या दिशेने वाहत आहेत याचा अंदाज येऊ शकेल. या निवडणुका म्हणजे जणू काही ‘छोटय़ा विधानसभा’ निवडणूकच. या निवडणुकांकडे राजकीय पक्ष कोणत्या कोनातून पाहतात यावर या दूरसंवाद मालिकेच्या माध्यमातून प्रकाश टाकण्यात येईल.

संवादमालिका..

आगामी निवडणुकाबाबत या नेतेमंडळींची भूमिका या संवादमालिकेतून जाणून घेतली जाईल. या मालिकेची सुरुवात सोमवारी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी संवादातून होईल, तर समारोप मुख्यमंत्री ठाकरे यांच्याबरोबर संवादाच्या माध्यमातून होईल.

सहभागासाठी.. 

http://tiny.cc/LS_Drushti_ani_Kon 2022 येथे ऑनलाइन नोंदणी किंवा क्यू आर कोडद्वारे या वेबसंवादात सहभागी होता येईल.

मुख्य प्रायोजक महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ सहप्रायोजक  महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Quartet politics state observing local elections lok satta vision angle initiative ysh