मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक व्यवहार विषयक मंत्रिमंडळ समितीने (सीसीईए), विपणन हंगाम २०२७-२८ साठी सर्व अनिवार्य रब्बी पिकांच्या किमान आधारभूत किमतीत (एमएसपी) वाढ करण्यास मंजुरी दिली आहे. सर्वाधिक वाढ करडईसाठी प्रति क्विंटल ६७५ रुपये इतकी असून, त्यानंतर मोहरीसाठी प्रति क्विंटल ४१३ रुपयांची वाढ आहे.

शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनासाठी किफायतशीर भाव मिळावेत, याची खात्री करण्यासाठी सरकारने विपणन हंगाम २०१७-२८ साठी रब्बी पिकांच्या किमान आधारभूत किमतीत (एमएसपी) वाढ केली आहे. किमान आधारभूत किमतीतील सर्वाधिक वाढ करडईसाठी प्रति क्विंटल ६७५ रुपये इतकी जाहीर करण्यात आली आहे. त्या खालोखाल मोहरीसाठी प्रति क्विंटल ४१३ रुपयांची वाढ करण्यात आली. मसूर, बार्ली, हरभरा आणि गहू यांच्या दरात अनुक्रमे ३९० रुपये, १३६ रुपये, ८३ रुपये आणि २५ रुपये प्रति क्विंटल वाढ करण्यात आली आहे.

केंद्र सरकारने जाहीर केलेला रब्बी पिकांसाठीचा हमीभाव खर्चाच्या दीडपट आहे. अखिल भारतीय स्तरावरील उत्पादनाच्या भारित सरासरी खर्चाच्या तुलनेत अपेक्षित नफ्याचे प्रमाण गव्हासाठी १०६ टक्के आहे, त्या खालोखाल मोहरीसाठी ९६ टक्के, मसूरसाठी ९२ टक्के, हरभऱ्यासाठी ५९ टक्के, बार्लीसाठी ५८ टक्के, आणि करडईसाठी ५० टक्के इतके आहे. रब्बी पिकांच्या वाढीव किमान आधारभूत किंमतीमुळे शेतकऱ्यांना योग्य भाव मिळेल आणि पिकांच्या विविधतेला प्रोत्साहन मिळेल, असा दावा केंद्र सरकारने केला आहे.